बास्केटबॉलपटू वैष्णवी यादव, अमेरिकेच्या संघाशी करारबद्ध

    दिनांक :24-May-2019
नवी दिल्ली,
 
भारताची 17 वर्षीय स्टार बास्केटबॉलपटू वैष्णवी यादव ही अमेरिकेच्या पेनसॅकोला राज्य महिला बास्केटबॉल संघासोबत गुरुवारी करारबद्ध झाली आहे.
 
 
 
 
 
पाच फुट सात इंच देहयष्टीची वैष्णवी हिने फिबा आशियाई 18 वर्षांखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेत, फिबा आशियाई 16 वर्षांखालील मुलींच्या तसेच फिबा 16 वर्षांखालील मुलींच्या आशियाई चषक बास्केटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्युनियर राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत एका सामन्यात वैष्णवीने तब्बल 71 गुणांची नोंद केली, तेव्हा ती एकदम प्रकाशझोतात आली होती. ती पहिल्या एनबीए अकादमी इंडिया स्पर्धेत तसेच 18 वर्षांखालील राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेतही खेळली आहे.
वैष्णवीने आपल्या यशाचे श्रेय एनबीए अकादमीने दिलेल्या प्रोत्साहन व पाठबळाला दिले आहे.
 
अकादमीच्या अनुभवी प्रशिक्षकांकडून तिला बास्केटबॉलचे दर्जेदार धडे गिरविण्याची संधी मिळाली. पेनसॅकोला स्टेट संघात दाखल होण्यास मी अतिशय रोमांचित झाली आहे. या संधीबद्दल मी भारतीय बास्केटबॉलचे आणि एनबीए अकादमी व प्रशिक्षक ब्लेअर हारदिएक आभार मानते. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकली असे वैष्णवी म्हणाली.