मोदींच्या पुनरागमनाने हादरले विदेशी माध्यमजगत

    दिनांक :24-May-2019
 
 
कौतुक करतानाच टीकास्त्रही
 
 नवी दिल्ली, 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या अभूतपूर्व विजयाची विदेशी माध्यमांध्ये जोरदार चर्चा आहे. मात्र, विदेशी माध्यमजगत अक्षरश: हादरले असल्याचे चित्र आहे. अनेकांनी मोदींच्या विजयाचे कौतुक करतानाच मागील पाच वर्षांतील मोदींच्या कारभारावरही टीकास्त्र सोडण्याची संधी सोडलेली नाही. अल्पसंख्यक, गरिबी या मुद्यांवरून त्यांनी मोदींना टीकेचे लक्ष्य केले आहे. ‘दि गार्डियन’ने सर्वाधिक तोंडसुख घेतले आहे. चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने मात्र या नव्या सरकारबाबत अद्याप मतप्रदर्शन केलेले नाही. कदाचित चीनचे अजून धोरण ठरायचे असावे. या विविध वृत्तपत्रांच्या संपादकीयांतील सारांश पुढीलप्रमाणे :

 
 
द वॉिंशग्टन पोस्ट
राष्ट्रवादाच्या मुद्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक जिंकली. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाने जगातील सर्वात मोठ्या निवडणुकीत विजय मिळविला आहे. भारतीय मतदारांनी मोदींच्या सर्वशक्तिमान आणि हिंदुत्वादी या प्रतिमेवर शिक्कामोर्तब केले आहे.
द न्यू यॉर्क टाइम्स
भारताचे चौकीदार नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक विजय झाला आहे. मोदींच्या काळात अल्पसंख्यकांना असुरक्षित वाटत होते. उद्योगपतींना मदत करतानाच ते गरिबीचेही दाखले देत होते. त्यांनी तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले नाहीत. त्यांनी हिंदू राष्ट्रवादाच्या साह्याने भारतात ऐतिहासिक विजय मिळविला आहे.
दि गार्डियन
मोदींच्या लोकप्रियतेमुळे भारतीय राजकारणाने आता हिंदू राष्ट्रवादाच्या नव्या युगात प्रवेश केला आहे. मोदींचा विजय होणे ही भारतासाठी वाईट गोष्ट आहे. अल्पसंख्यकांना दुय्यम दर्जा देणार्‍या राष्ट्रवादी नेत्याची जगाला गरज नाही. मोदींचा विजय हा धार्मिक राष्ट्रवादाचा विजय आहे.
बीबीसी वर्ल्ड
मोदींनी नेत्रदीपक विजय मिळवला आहे. आता पुढची पाच वर्षे तेच पंतप्रधान राहतील. मोदींना मिळालेले बहुमत म्हणजे त्यांच्या हिंदू राष्ट्रवादी राजकारणाला मिळालेले बहुमत आहे.
गल्फ न्यूज
भाजपाने अभूतपूर्व विजय संपादन केला आहे. विरोधकांनी मोदींसमोर शेतकर्‍यांच्या समस्या, रोजगाराच्या समस्या, राफेलचा मुद्दा उपस्थित करून आव्हान निर्माण केले होते. मात्र, भारताने बालाकोटमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजपाची कथा नव्याने लिहिली.
डॉन (पाकिस्तान)
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मोदींना दुसरा कार्यकाळ मिळाला आहे. निवडणुकीत मोदींनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी बालाकोट सर्जिकल स्ट्राईकचे सूत्रधार असल्याचे ठसवीत विखुरलेल्या विरोधकांवर मात केली.
भाजपाचे पाकिस्तानबाबतचे धोरण बदलणार नाही आणि दोन्ही देशांतील तणाव कमी होणार नाही. आता मोदी हे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शांती प्रस्तावाकडे लक्ष देतील का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सीएनएन
मोदींनी स्वतःला या देशाचा रक्षक असल्याचे दर्शवले. हा एक वेगळाच संदेश देण्यात आला. 2014 मध्ये अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या आश्वासनांनी मोदींना लोकप्रिय बनवले. यामुळेच मोदींना फक्त भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात गंभीरतेने घेतले जाते.
जियो टीव्ही
मोदी प्रचाराच्या सुरुवातीला काही विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि काही राज्यांतील महागाई-बेरोजगारीवरील जनेतेच्या रोषामुळे दबावात होते. मात्र, सर्जिकल स्ट्राईकनंतर भाजपाला फायदा झाला. भाजपाची निवडणूक यंत्रणा ही तळागाळापर्यंत अधिक प्रभावी होती.