ख्रिस्तोफर नोलानच्या चित्रपटात झळकणार ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री

    दिनांक :24-May-2019
ख्रिस्तोफर नोलान हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने ‘इनसेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ ‘बॅटमॅन द डार्क नाइट’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता हा महत्वकांक्षी दिग्दर्शक आपल्या अगामी चित्रपटाची तयारी करत आहे. त्यामुळे विदेशी प्रेक्षकांसह भारतीय प्रेक्षकांनाही त्याच्या या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे त्याच्या या आगामी चित्रपटामध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.
ख्रिस्तोफर नोलान याच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘टेनेट’ असं असून या चित्रपटामध्ये अभिनेत्री डिंपल कपाडिया झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने डिंपल कपाडिया पहिल्यांदाच त्याच्यासोबत काम करणार आहे.
 
 
 
 

 
 
 
 
 
‘टेनेट’ हा चित्रपट १७ जुलै २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी जगातील सर्वात मोठ्या प्रोडक्शन कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॉर्नर ब्रदर्स कंपनीने स्विकारली आहे. टेनेट, या शब्दाचा अर्थ सिद्धांत असा होतो. चित्रपटाच्या नावावरूनच नोलान पुन्हा एकदा डार्क नाईट ट्रायोलॉजी किंवा डंकर्क पठडीतला चित्रपट तयार करत असल्याची चर्चा होती. परंतु, यावेळी नोलान आपल्या पारंपारिक शैलीपेक्षा एक वेगळाच प्रयोग करत असल्याची माहिती निर्माते वॉर्नर ब्रदर्स यांनी दिली आहे. यामुळे चाहते या अगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
 
 
 
 
 
 
‘टेनेट’ या चित्रपटात अभिनेत्री डिंपल कपाडिया व्यतिरिक्त माइकल केन, केनेथ ब्रेनॉग, एरॉन टेलर जॉनसन, क्लीमेंस पोसी आणि एलिजाबेथ डेबिकी हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. अभिनेत्री डिंपल कपाडियाच्या भूमिकेविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती वॉर्नर ब्रदर्स यांनी दिलेली नाही. मात्र ख्रिस्तोफर नोलानची पार्श्वभूमी पाहता डिंपल एका सशक्त भूमिकेत दिसणार यात शंका नाही.