सुदिरमन चषक बॅडमिंटन स्पर्धा : भारताचे आव्हान संपुष्टात

    दिनांक :24-May-2019
नॅनिंग (चीन),
 
सुदिरमन चषक मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे आव्हान बुधवारी संपुष्टात आले. १० वेळा विजेत्या चीनने दुसऱ्या आणि अखेरच्या गटसाखळी लढतीत भारताचा ५-० असा धुव्वा उडवला.
सलामीच्या सामन्यात मलेशियाकडून ३-२ असा पराभव पत्करणाऱ्या भारताने बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने चीनविरुद्ध कामगिरी उंचावण्याची आवश्यकता होती. परंतु भारतीय बॅडमिंटनपटू पुन्हा अपयशी ठरले. मिश्र दुहेरीच्या पहिल्या लढतीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थनावर असलेल्या वांग यिलयू आणि ह्युआंग डाँगपिंग जोडीने प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीचा २१-५, २१-११ असा पराभव करून १-० अशी आघाडी मिळवली.
 
 

 
मलेशियाविरुद्धच्या लढतीत ली झि जियाविरुद्ध समीर वर्माला खेळवणे भारताला महागात पडले होते. परंतु किदम्बी श्रीकांतला सराव सत्रात दुखापत झाल्यामुळे पुन्हा समीरवरच विसंबून राहावे लागले. समीरने ऑलिम्पिक विजेत्या चेन लाँगविरुद्ध पुरुष एकेरीत कडवी झुंज दिली. परंतु एक तास आणि ११ मिनिटे चाललेल्या सामन्यात चेनने समीरला २१-१७, २२-२० असे नामोहरम करून चीनला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
मग पुरुष दुहेरीत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या हॅन चेंगकाय आणि झोऊ हाओडाँग जोडीने सत्विकसाईराज रनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला १८-२१, २१-१५, २१-१७ असे पराभूत केले. त्यानंतर महिला एकेरीत ऑल इंग्लंड विजेत्या चेन युफेईने ३३ मिनिटांत सायना नेहवालचा २१-१२, २१-१७ असा पराभव केला. महिला दुहेरीच्या अखेरच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरील चेन क्विंगचेन आणि जिया यिफान जोडीने अश्विनी पोनप्पा आणि सिक्की जोडीला २१-१२, २१-१५ असे पराभूत केले.