कोहली म्हणतो 'हा' संघ विश्वचषकात सगळ्यात बलाढ्य

    दिनांक :24-May-2019
भारताचा कर्णधार विराट कोहली याने एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. अनेक क्रिकेट जाणकार भारतीय संघाला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानत असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा मात्र इंग्लंडचा संघ हा सर्वात बलाढ्य संघ असल्याचे सांगत आहे. इंग्लंडमध्ये सर्व संघाच्या कर्णधारांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्याने हे मत व्यक्त केले.
 
 
 
 
 
 
 
 “यंदाची विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये आहे. त्यांच्या घरच्या वातावरणात ते नक्कीच चांगला खेळ करू शकतात. त्यामुळे इंग्लंडचा संघ हा यंदाच्या विश्वचषकात सगळ्यात बलाढ्य संघ आहे”, असे विराट म्हणाला. “त्याबरोबरच इतर संघदेखील अत्यंत समतोल आहेत. इतर संघांमध्येही चांगले खेळाडू आहेत, त्यामुळे हे संघ देखील बलशाली आहेत. अशा परिस्थितीमध्ये यंदाची विश्वचषक स्पर्धा ही नक्कीच रंगतदार आणि आव्हानात्मक असणार आहे”, असा पुनरुच्चारही कोहलीने केला.
“इंग्लंडचा संघ गेल्या काही दिवसात ज्या पध्दतीचा खेळ करत आहे, त्यावरून तो संघ लवकरच ५० षटकात ५०० चा टप्पा गाठेल असे वाटते आहे. कारण ५० षटकांचा खेळ असला तरीही इंग्लंडचे फलंदाज पहिल्या चेंडूपासून प्रहार करतात आणि मोठे फटके खेळण्याकडे लक्ष देतात. पण असे असले तरी ही विश्वचषक स्पर्धा आहे. त्यामुळे त्याचे एक वेगळे दडपण असते. त्यामुळे २६० ते २७० चे आव्हानदेखील ३७० ते ३८० धावांचे असल्याप्रमाणे वाटू शकते. स्पर्धेच्या उत्तरार्धात फारसे मोठ्या धावसंख्येचे सामने होतील असे वाटत नाही. काही संघ दमदार कामगिरी करू शकतील, पण स्पर्धेतील दडपण पाहता २५० ही धावसंख्यादेखील आव्हानात्मक असेल”, असेही कोहलीने नमूद केले.