नाना पटोले राजकीय सन्यास घेणार का ?

    दिनांक :24-May-2019
नागपूर : यंदा नागपूर मतदार संघाची लोकसभा निवडणूक विशेष चर्चिली गेली. या मागचे कारण म्हणजे नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले असा सामना असतांना निवडणुकीआधी नाना पटोले यांनी एक जाहीर घोषणा केली होती. ती म्हणजे, 'जर नितीन गडकरी माझ्यापेक्षा एका मतानेही जास्त निवडून आले तर मी राजकीय सन्यास घेईल' अशी आव्हानात्मक घोषणा पटोले यांनी केली आणि राजकीय वर्तुळात भल्या भाल्याच्या भुवया उंचावल्या गेल्या. काल जाहीर झालेल्या निकालात नाना पटोले यांचा नितीन गडकरी यांनी दारुण पराभव केला. गडकरींनी निर्णायक आघाडी घेतल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पटोले यांना त्यांच्या घोषणेची आठवण करून देण्यास प्रारंभ केला. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ' पटोले यांनी आधी घोषित केल्याप्रमाणे सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावे', असे आवाहन केले. गडकरी यांनी मात्र राजकीय परिपक्वता दाखविली. विजयी आघाडी निश्चित झाल्यानंतरच्या पत्रपरिषदेत पटोले यांना उद्देशून गडकरी म्हणाले, 'राजकारणात जय-पराजय होतच असतात. त्यांनी संन्यास घेऊ नये. जनतेची कामे करावी. विरोधक म्हणून भूमिका पार पाडावी.' तर दुसरीकडे राजकीय संन्यास घ्यायचा की नाही हे नंतर बघू. सामाजिक काम करण्यापासून मला कुणीही रोखू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.