पराजयाचा आनंद...

    दिनांक :24-May-2019
बरेचदा कोण जिंकले याच्या आनंदापेक्षा कोण पराभूत झाले याचा आनंद जास्त असतो. 2019च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल अशाच प्रकारचा आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा व रालोआने जो विजय मिळविला आहे, त्याचा निश्चितच आनंद आहे. परंतु, जे पक्ष, ज्या वृत्ती आणि मानसिकता पराभूत झाल्यात, त्याचा जास्त आनंद आहे. या देशाची अध्यात्माधारित जी जडणघडण आहे, तिलाच उद्ध्वस्त करण्याची जिवापाड धडपड करणारे पक्ष, शक्ती या निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. ही भारताच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय समाधानाची बाब आहे, असे माझे मत आहे.
 
 
 
ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व विरोधी पक्ष अशी होती. त्यावरही काही ‘खान मार्केट’ पत्रकारांनी व विचारवंतांनी टीका केली. नरेंद्र मोदी यांनी ही निवडणूक वैयक्तिक केली, असा त्यांचा आरोप होता/आहे. नीट बघितले तर यात नरेंद्र मोदी यांचा काही दोष नाही. विरोधी पक्ष आणि देशातील कथित विचारवंत, राजकीय धूर्त पंडित व दरबारी पत्रकार यांनीच ही निवडणूक एका व्यक्तीविरुद्ध सर्व अशी करून टाकली होती. मोदींनी फक्त विरोधकांच्या ‘जशा’ला ‘तसे’ उत्तर दिले, एवढेच. भाजपाचे सर्व राजकीय विरोधक आपल्या अस्तित्वाबाबत आशंकित होते. भाजपाच्या भगव्या लाटेने आपले राजकीय अस्तित्वच समाप्त होते की काय, अशी त्यांना केवळ शंकाच नाही, तर मनोमन खात्री होती. परंतु, राजकीय पक्षांना अशा प्रकारच्या हारजितची सवय असली पाहिजे. कालांतराने त्यांचा पक्ष पुन्हा उसळी मारून वर येऊ शकतो. परंतु, या देशातील कथित विचारवंत, धूर्त राजकीय विश्लेषक व दरबारी पत्रकार यांना कसली भीती असावी? भाजपा येवो अथवा कॉंग्रेस, त्यांचे असे कुठले अस्तित्व पणाला लागणार होते? हां, काही आर्थिक नुकसान झाले असते. मग तरीही ही मंडळी इतक्या त्वेषाने मोदींच्या विरोधात का उतरली होती? याचे उत्तर शोधले तर, मोदींच्या विजयापेक्षा या मंडळींच्या, त्यांच्या भारतविरोधी वृत्तीचा पराभवाचा आनंद जास्त का व्हावा, हे कळून येईल.
 
आपल्या भारताचे दुर्दैव आहे की, स्वातंत्र्यानंतरही भारताला त्याच्या स्वाभाविक व युगानुयुगे टिकलेल्या आधारावर उभे राहू देण्यात आले नाही. जगातील यच्चयावत संस्कृती व सभ्यता काळाच्या ओघात नष्ट झाल्या असताना, केवळ आणि केवळ भारतीय संस्कृतीच हजारो वर्षांपासून टिकून आहे. निव्वळ टिकूनच नाही, तर ती पुन्हा उसळी मारण्याच्या तयारीत व स्थितीत आहे, हे वास्तव या मंडळींना सहन होत नव्हते. ज्या कार्ल मार्क्सने कधीही भारत पाहिला नाही, कधी भारतासंबंधी साहित्य वाचले नाही, अशा त्या मार्क्सच्या आदेशानुसार हा भारतीय समाज नष्ट करण्याचे कार्य या मंडळींनी शिरावर घेतले आहे. हा समाज संपूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय इथे क्रांतीची बीजे पेरता येणार नाही आणि म्हणून जे जे कुणी या संस्कृतीला नष्ट करण्याचे प्रयत्न करीत असतात, त्या सर्वांना या मंडळींचा सर्वतोपरी पािंठबा असतो. गेल्या 60-65 वर्षांपासून या मंडळींनी भारतातील संपूर्ण वैचारिक विश्वावर कब्जा मिळविला आहे. त्यामुळे साहित्यविषयक संस्था, पुरस्कार, शैक्षणिक धोरण ठरविणार्‍या संस्था, सांस्कृतिक संस्था, पत्रकारिता... काहीही घ्या, तिथे ही मंडळी त्यांच्या विचारांच्याच व्यक्तींना प्रवेश देत असतात. एखाद्याच्या बाबतीत थोडी जरी शंका आली तरी त्या व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविलेला आहे. ही मंडळी बुद्धिवान असल्यामुळे आपल्या या कट्‌टर असहिष्णुतेचा कुणाला वासही येणार नाही, उलट आपल्या प्रत्येक (हुकूमशाही) कृतीचा लोक लोकशाहीवादी, सेक्युलर, लिबरल म्हणून गौरव करतील, अशी एक व्यवस्था यांनी करून ठेवली आहे. ही जी विषवल्ली गेल्या 60-65 वर्षांत भारतात चांगलीच फोफावली होती, तिला उपटून टाकण्याचे काम 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीने प्रथम केले. परंतु, पाच वर्षांत ही विषवल्ली पुन्हा डोके वर काढू लागली होती आणि 2019 च्या निकालांनी या विषवल्लीचे हे फुटवे पुन्हा उपटून फेकून दिले आहेत. ही फार महत्त्वाची उपलब्धी म्हटली पाहिजे.
 
या वामपंथी वैचारिक मंडळींना भारताच्या समाजजीवनात इतके हातपाय पसरायला कशी काय संधी मिळाली, असा प्रश्न मनात येऊ शकतो. त्यालाही आपण भारतीयच कारणीभूत आहोत. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेस पक्षात सर्वच विचारसरणीचे मातब्बर लोक होते. महात्मा गांधी एक विलक्षण असे चुंबक होते. त्यामुळे कॉंग्रेसमध्येही हिंदुत्वाचा विचार मानणारे अनेक नेते होते. हे नेते अत्यंत प्रभावशालीही होते. समाजातही हिंदुत्वाचा विचार मानणारे अनेक समाजधुरीण सक्रिय होते. स्वातंत्र्यानंतर नव्या भारताच्या उभारणीत या मंडळींचा सक्रिय सहभाग तर राहणारच होता. एवढेच नव्हे, तर प्रभावही राहिला असता. परंतु, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सहा महिन्यांतच महात्मा गांधींची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर कॉंग्रेस पक्षात असलेल्या हिंदुत्व विचारांच्या नेत्यांचे तोंड बंद झाले. त्यांचा प्रभाव ओसरला. एवढेच नव्हे, तर समाजातीलहीहिंदुत्व विचार लोकांच्या घृणेचा विषय ठरला. भारताच्या समाजजीवनातील ही पोकळी भरून काढण्याची एक अनायास संधी या वामपंथी विचारकांना मिळाली आणि त्यांनी हिंदुत्वद्वेषाच्या आगीत अधिकाधिक तेल ओतत, आपली पोळी तर भाजून घेतलीच, शिवाय हिंदुत्वाचा विचार या देशातून हद्दपार होईल, अशी व्यवस्थाही केली. अशा रीतीने, शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने, अत्याचाराने पीडित असलेला हा देश, एका माथेफिरूच्या कृत्यामुळे या वामपंथी लोकांना जणूकाही आंदणच दिल्यासारखा झाला. त्याची फळे इतकी वर्षे या भारतमातेने भोगली आहेत आणि आजही भोगत आहे. कितीतरी पिढ्यांची मानसिकताच या वामपंथीयांनी बदलून टाकली आहे. त्यामुळे आज या देशात सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यविषयक गंभीर प्रश्न उभे झाले आहेत, त्याचे निराकरण करता करताहिंदुत्वाच्या विचाराला नाकी नऊ येत आहेत. कार्ल मार्क्सच्या वामपंथी विचारांचा राजकीय क्षितिजावर पराभव होत असला, तरी भारतीयांच्या मानसिकतेत जी ही विचारसरणी घुसविण्यात आली होती, ती मानसिकता मात्र अजूनही कायम होती. या मानसिकतेपायीच हिंदुत्वाचा विचार मागासलेला, प्रतिगामी, बुरसटलेला आहे, असे भारतातील सुशिक्षित लोक मानू लागले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या आचरणातून जो काहीहिंदुत्वाचा म्हणून विचार प्रकट होत होता, ते प्रकटीकरणही विकृत स्वरूपात बाहेर येऊ लागले होते आणि या आचरणावरून ही वामपंथी मंडळीहिंदुत्वाच्या विचाराला सतत झोडपत राहायची. या भारतविरोधी विचाराला कॉंग्रेस िंकवा भाजपेतर राजकीय पक्षांच्या राजवटींनी सर्व प्रकारची राजकीय व आर्थिक मदत केली आहे आणि आजही करत आहेत. केवळ आणि केवळ भाजपाच या भारतविरोधी विचाराला पायबंद घालू शकते. 2014 पासून त्या दिशेने बरेच काम झाले आहे. परंतु ते पुरेसे नव्हते. म्हणून 2019 मध्ये पुन्हा भाजपा स्वबळावर सत्तेत येण्याचा विशेष आनंद आहे. आता हे काम वेगाने पूर्णत्वास जाईल, अशी आशा आहे.
 
शेकडो वर्षांच्या दडपशाहीने, अत्याचाराने, मती भ्रष्ट करण्याच्या सतत प्रयत्नानेदेखील भारतीय समाजाची अध्यात्माधारित मानसिकता बदलविण्यात या मंडळींना फार यश आले नाही. काही अपरिहार्यतेमुळे, परिस्थितीच्या दबावामुळे ही मानसिकता प्रकट झाली नसेल, पण ती भारतीयांच्या आतल्या आत धुमसत होती. या समाजाला हा भारत देश पुन्हा एकदा विश्वगुरुपदी विराजमान झालेला पाहायचा आहे. पुन्हा एकदाहिंदुत्वाचा विचार समाजजीवनाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात प्रतिष्ठित झालेला बघायचा आहे. त्या इच्छेचे प्रतीक म्हणून लोकांनी नरेंद्र मोदी यांना निवडले आहे. याची जाणीव असल्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी, ही निवडणूक जनतेनेच लढली असे म्हटले आहे. भारतीय जनतेने, या अशा भारतविरोधी शक्तींचा व मानसिकतेचा दुसर्‍यांदा निर्णायक पराभव केला असल्यामुळे, त्याचा आनंद, नरेंद्र मोदी यांच्या विजयापेक्षा अधिक होणे स्वाभाविक नाही का?
9881717838