विदेश प्रवासाला निघालेल्या गोयल दाम्पत्याला रोखले

    दिनांक :25-May-2019
मुंबई: जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांना मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन प्रशासनाने शनिवारी विदेश दौर्‍याची परवानगी नाकारत प्रवासापासून रोखल्याची माहिती सूत्राने दिली.
गोयल दाम्पत्य दुबई येथील अमिरातच्या ईके-57 विमानाने विदेश प्रवास करणार होते. मात्र, विमानतळावरील इमिग्रेशन प्रशासनाने त्यांच्या प्रवासाला परवानगी नाकारली, असे सूत्राने सांगितले. अनिता गोयल यांच्या नावाचे प्रवासी सामानही विमानातून उतरवून घेण्यात आले. हे विमान दुपारी 3.35 वाजता उड्डाण करणार होते. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नरेश गोयल उपलब्ध होऊ शकले नाहीत, तर अमिरात विमान कंपनीने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
जेट एअरवेजच्या कर्मचार्‍यांचे पगार अद्याप रखडलेले आहेत. त्यामुळे गोयल यांच्यासह कंपनीच्या इतर संचालकांचे आणि व्यवस्थापनातील अधिकार्‍यांचे पासपोर्ट गोठवण्यात यावेत, अशी मागणी जेट एअरवेजच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहून केली होती.