जातिभेदविरहित मानसिकतेचा प्रत्यय...

    दिनांक :25-May-2019
2019च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून भारतीयांनी जो जनादेश स्पष्ट केला आहे, त्यातून भारत आता एका नव्या आणि आश्वासक वळणावर आलेला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. निवडणुकीच्या आकडेवारीचे विश्लेषण, कुणाला किती टक्के मते मिळाली, कोण कमी पडले, कुणी किती कमी मते घेतली, ‘नोटा’ला किती मते पडली, वगैरे बाबींवर भरपूर चर्चा होत आहे आणि होतही राहणार. परंतु, या निकालाची काही वैशिष्ट्ये आहेत, त्याची मात्र फार चर्चा होताना दिसत नाही. एकतर तशी चर्चा कथित बुद्धिवंतांना, मीडियाला सोयीची नसावीकिंवा त्याकडे या मंडळींचे लक्षच गेलेले नसावे.
 
 
 
भारतातील निवडणुकीचे राजकारण हे जात, भाषा, प्रांत यांच्या अस्मितेवरच बव्हंशी चालत असते, असे एक चित्र रेखाटण्यात आले आहे. त्यात अजीबात तथ्य नाही असेही म्हणता येणार नाही. परंतु, समाज हा सतत परिवर्तनशील असतो आणि काळाच्या प्रवाहानुसार त्यात सातत्याने बदल होत असतात, ही वस्तुस्थिती या मंडळींच्या नजरेआड झाली असावी आणि म्हणूनच ठरलेले साचेबंद विश्लेषण येणे सुरू झाले आहे. लोकसभेच्या या निवडणूक निकालांचे सूक्ष्म अवलोकन केले असता लक्षात येते की, भारतीय समाज जातिपातीच्या, प्रांतभेदाच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास सिद्ध झाला आहे. त्याची झलक या समाजाने 2014 सालच्या निवडणुकीत दाखविली होती. परंतु, त्याकडे एक योगायोग म्हणून दुर्लक्ष करण्यात आले. सोनिया गांधींच्या नेतृत्वातील संपुआ सरकारच्या प्रचंड भ्रष्टाचारी राजवटीविरुद्ध जनतेने आपला रोष, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील रालोआला स्पष्ट बहुमत देऊन व्यक्त केला होता. असे करताना मतदारांनी जात, पात, भाषा, प्रांत यांच्या अस्मितेकडे दुर्लक्ष केले. परंतु, ही तात्पुरती मानसिकता होती. कालांतराने भारतीय समाज पुन्हा आपल्या मूळ जातिपातीच्या, प्रांत-भाषेच्या अस्मितेच्या मानसिकतेत गेला आहे, असेच हे विश्लेषक समजत राहिले. परंतु, यावेळच्या निवडणुकीतही भारतीय मतदारांनी जातिपातीच्या, प्रांत-भाषाभेदाच्या मानसिकतेला बाजूला सारून विकास, देशाची सुरक्षा, भारताची जगात वाढलेली प्रतिष्ठा व प्रभाव, दहशतवादाविरुद्ध खंबीर भूमिका आणि राष्ट्रीयतेचा अभिमान या मुद्यांना प्राधान्य देत मतदान केले. भारतीय मतदारांची ही मानसिकता, या विश्लेषक मंडळींना बुचकाळ्यात टाकून गेली आहे.
2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेश व बिहार राज्यांच्या निकालांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. भाजपाला इतक्या प्रचंड प्रमाणात यश मिळाले याचा अर्थ, मतदारांनी सर्व भेदाभेदांना बाजूला सारून मतदान केले असे होते. या निकालांनी हादरलेल्या पराभूत राजकीय पक्षांनी, नव्या उमेदीने जातिपातीचे समीकरण बसवून भाजपाची यशदौड रोखण्याचा निश्चय केला. नंतर झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत याचे फळ त्यांना मिळालेही. भाजपा पराभूत झाली. असे म्हणतात की, उत्तरप्रदेश व बिहार या राज्यांमध्ये आजही सार्वजनिक जीवनात जातीला अत्यंत महत्त्व आहे. तसे सांगितले जाते आणि तसा अनुभवही येतो. त्यामुळे तोंडाने कितीही जातविरहित राजकारणाचा जप करीत असले, तरी राजकीय पक्षांना नाइलाजाने का होईना, पण निवडणुकीसाठी जातीचा आधार घ्यावाच लागतो. या दोन राज्यांत तर सर्वच प्रादेशिक पक्ष एखाद्या जातीपुरतेच मर्यादित आहेत. जात हीच त्यांच्या शक्तीचा आधार आहे. हे लक्षात घेऊन 2019च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात मायावतींच्या बहुजन समाज पार्टीने (बसपा) व अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने (सपा) युती करून, दिल्लीत सिंहासनावर कोण बसणार, याची किल्ली आपल्या हातात ठेवण्याची योजना आखली. बाकी इतिहास सर्वांनाच माहिती आहे. कागदांवरील जातीच्या समीकरणावरून उत्तरप्रदेशात भाजपाला 20 जागाही मिळणे कठीण होईल, असेच सर्व मानत होते. परंतु, झाले उलटेच. भाजपाने इथे 62 जागा मिळविल्या आहेत. या निकालामुळे जातीवर आधारित पक्ष हादरले असले, तरी ज्यांना भारतीय समाजातील हा जातिभेद नष्ट व्हावा असे वाटते, ते मात्र सुखावले आहेत. महात्मा गांधीकिंवा डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना अभिप्रेत असलेला जातिविरहित समाज बनण्याच्या दृष्टीने भारतीय समाजाने टाकलेले हे लहानसे का होईना, पण एक निश्चयी पाऊल आहे, याची नोंद घ्यावीच लागेल.
आपल्या भारतीय समाजात जातिभेदाचा शिरलेला हा कली कायमचा बाहेर जावा, यासाठी कमी लोकांनी प्रयत्न नाही केलेत! परंतु, त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. या महापुरुषांच्या निष्ठेत, प्रामाणिकपणात, त्यांनी घेतलेल्या श्रमात कुठेच कमतरता नव्हती. परंतु, तरीही भारतीय समाज हा बव्हंश: जातिभेदाच्या कलीच्या विळख्यातच राहिला. हा विळखा निवडणुकीच्या राजकारणाने अधिकाधिक घट्‌टच झालेला आपण पाहिले आहे. जे यश भारतातील या महापुरुषांना बघावयास मिळाले नाही, ते काही प्रमाणात का होईना साकार करण्याचे श्रेय भारतीय जनता पार्टीला द्यावे लागेल. गंमत म्हणजे, ज्या राजकीय पक्षाला भारतातील बुद्धिवंत व मीडियाने जातीयवादी पक्ष म्हणून सतत हिणवले, या पक्षाबाबत समाजात एक अढी निर्माण केली, या पक्षाला एकापरीने अस्पृश्य ठरविण्याचे जोरकस प्रयत्न झालेत, त्याच पक्षाने समाजाला जातिभेदविरहित मतदान करण्यास प्रवृत्त केले आहे. हे भाजपाचे यश निश्चितच अभिनंदनीय म्हणता येईल.
तुकड्या-तुकड्यात विभागला गेलेला हिंदू समाज, जो या देशाचा आधार आहे, समरसतेच्या भावनेने एक आला पाहिजे, प्रत्येक भारतीय आपला बांधव आहे आणि त्यामुळे परस्परांत एक बंधुत्वाचा बंध बळकट असला पाहिजे, यासाठी 1925 साली डॉ. हेडगेवार यांनी रा. स्व. संघाची स्थापना केली. या दूरदृष्टीच्या नेत्याने सुरू केलेल्या या अनोख्या प्रयोगाला चिरडण्याचे, संपविण्याचे, बदनाम करण्याचे कितीतरी प्रयत्न झालेत. परंतु, संघाचे हे समरसतेचे काम अव्याहत सुरू राहिले. समाजाने कधी उपेक्षा केली, कधी विरोध केला, तरीही त्याकडे लक्ष न देता संघाचे हे काम आजही सुरू आहे. हे कार्य कालांतराने समाजात बर्‍यापैकी रुजले आहे. त्याची मधुर फळे आज आपल्याला चाखायला मिळत आहेत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात ‘सबका साथ, सबका विकास’ या सूत्राने आपले कामकाज केले. शासन-प्रशासनाला नागरिकांमध्ये भेद करण्याचा अधिकार नसतो. आतापर्यंत ही नैतिक प्रथा कुण्या सरकारने पाळली होती की नाही माहीत नाही, परंतु नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मात्र कटाक्षाने ‘सबका साथ, सबका विकास’ हेच आपल्या प्रशासनाचे आधारसूत्र ठेवले. भारतीय जनतेला एक नवाच अनुभव आला. या अनुभवाची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नव्हती. या अनुभवाने त्यांना जातिपातीच्या राजकारणापासून दूर जाण्याची प्रेरणा दिली असणार आणि त्याचा आविष्कार त्यांनी या निवडणुकीत केला. ज्या विचारसरणीला जातीयवादी म्हणून धिक्कारण्यात आले, त्याच विचारसरणीत तरबेज झालेला एक पक्ष समाजातील जातिभेदाची भावना मवाळ करण्यास समाजाला प्रेरित करतो आणि समाजही त्याला भरभरून सकारात्मक प्रतिसाद देतो, हे विलक्षण वैशिष्ट्य यावेळच्या निवडणुकीत सर्वांना बघायला मिळाले आहे. समाजाची ही बदललेली मानसिकता कालांतराने स्थिरपद होईल आणि त्याचे प्रकटीकरण समाजजीवनाच्या लहानमोठ्या प्रत्येक क्षेत्रात होईल, याबाबत कुणीही शंका बाळगण्याचे कारण नाही, हाच संदेश 2019च्या निवडणूक निकालांनी दिलेला आहे...