अशोक चव्हाण देणार प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

    दिनांक :25-May-2019
 
मुंबई : लोकसभेत झालेला पराभव काँग्रेसच्या नेत्यांना खूपच जिव्हारी लागला आहे.  झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या सोबतच  देशात जिथं-जिथं काँग्रेसला अपयश आले आहे, तेथील सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत, असे आवाहनही चव्हाणांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसची पीछेहाट होत असताना महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची धूळधाण उडाली. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. खुद्द अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांनी त्यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. निकालानंतर आज प्रथमच अशोक चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका मांडली. पराभवाची जबाबदारी म्हणून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले . अन्य राज्यांतील प्रदेशाध्यक्षांनीही हीच भूमिका घ्यावी. जेणेकरून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने  पक्षाला तयारी करता येईल. तरुण नेत्यांना संधी देता येईल,' असे  चव्हाण म्हणाले.