Exclusive - मोहाळ्यात भाजपा कार्यकर्त्याची हत्या

    दिनांक :25-May-2019
आणखी एकाला जीवाने मारण्याचा प्रयत्न
लोकसभेतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेलसह १० जणांविरुध्द गुन्हा
कबुत्तरांचा वाद की राजकिय वैमनस्य
अकोट - एका काळात आदर्श ग्राम म्हणून राष्ट्रीय पातळीवर गौरव प्राप्त करणाऱ्या तालुक्यातील ग्राम मोहाळा येथे शुक्रवार(ता.२४)ला रात्री साडेसात वाजताच्या सुमारास भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या झाली.तर एका ग्रामस्थाला जीवाने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हत्येप्रकरणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अकोल्याचे जिल्हाध्यक्ष व येथे लोकसभा निवडणूकीतील पराभूत उमेदवार हिदायतउल्लाखाँ बरकतउल्लाखाँ पटेल यांच्यासह एकूण १० जणांविरुध्द हत्या,जीवाने मारण्याचा प्रयत्न व दंगलीच्या कलमान्वये शनिवारी,पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.या घटनेमुळे जिल्हाभर खळबळ उडाली आहे.

 
 
पोलिस सुत्रानुसार,मोहाळा गावात शुक्रवारी,रात्री साडेसात वाजताच्या सुमारास दोन गटात वाद झाले.या वादाचे कारण अद्यापही स्पष्ट नाही.या वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात हल्लेखोरांनी भाजप कार्यकर्ता मतीन खाँ शेर खाँ पटेल (वय अंदाजे -४८) यांच्या घरात घुसून त्यांच्यावर लोखंडी पाईप व लाकडी काठ्यांनी हल्ला चढवला.या हल्यात मतीन खाँ चा मृत्यू झाला.तर त्याला वाचवायला आलेला मुमताज खाँ मिया खाँ पटेल(वय-अंदाजे ५५)हा व्यक्ती गंभीर जखमी झाला.या घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी तातडीने ताफ्यासह घटनास्थळ गाठले.तो पर्यंत आरोपी परागंदा झाले होते.घटनास्थळाला अतिरिक्त पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख,उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल सोनवणे,शहाजी रुपनर आदींनी भेट देऊन पाहणी केली.घटना समजताच शहर ठाणेदार संतोष महल्ले,विशेष पथकाचे मिलींद बहाकर,दहीहांडाचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे आदी ग्रामीण ठाण्यात हजर झाले.
या प्रकरणी मृतकाचा चुलत भाऊ इनायत खाँ मिया खाँ पटेल यांने ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली.या तक्रारीनुसार काँग्रेस नेते हिदायउल्लाखाँ बरकउल्लाखाँ पटेल,इमरानउल्लाखाँ बरकतउल्लाखाँ पटेल,शफीकउल्लाखाँ बराकतउल्लाखाँ पटेल,फारुकउल्लाखाँ अताउल्लाखाँ पटेल,शोएबउल्लाखाँ अजहरउल्लाखाँ पटेल,फरीदउल्लाखाँ अताउल्लाखाँ पटेल,रहेमतउल्लाखाँ बरकतउल्लाखाँ पटेल,रफतउल्लाखाँ बरकतउल्लाखाँ पटेल,इस्ताकउल्लाखाँ अशफाकउल्लाखाँ पटेल व अजहरउल्लाखाँ फकरुउल्लाखाँ पटेल सर्व रा.मोहाळा यांच्या विरुध्द भादंविच्या कलम१४३,१४७,१४८,१४९,४५२,३०७,३०२ व २९४ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.या प्रकरणी तक्रारकर्त्याने सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.मोहाळा गावात सध्या राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली असून गावात सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे.
ग्रामीण पोलिस या हत्येचे कारण कबुत्तरावरुन निर्माण झालेला वाद सांगत असले तरी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीतील वैमनस्याची किनार त्यामागे असल्याचे बोलले जात आहे.या निवडणूकीत हिदायत पटेल यांचा दारुण पराभव झाला.त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.मृतक हा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता होता.त्याने निवडणूकीत पक्षाचे काम केले होते.तो विरोधी गटाविरुध्दच्या एका प्रकरणात मुख्य साक्षीदार असल्याची माहीती समोर आली आहे.त्यामुळेच कदाचित त्याच्यावर हल्ला झाला असल्याची जनमानसात चर्चा आहे.या प्रकरणी हिदायत पटेल यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.