पोटनिवडणुकीत गमावलेल्या जागा भाजपाने पुन्हा जिंकल्या

    दिनांक :25-May-2019
 
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या विजयाची नोंद केली. भाजपाप्रणीत रालोआने 350 हून अधिक जागा जिंकत मोदी लाट पुन्हा आल्याचे दाखवून दिले. मागील दोन वर्षांत देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने काही जागा गमावल्या होत्या. त्यामुळे मोदी लाट ओसरल्याचे बोलले जात होते. मात्र, या निवडणुकीत भाजपाने पोट निवडणुकीत गमावलेल्या जागादेखील आपल्या नावे केल्या.
गेल्या वर्षी भाजपाला उत्तरप्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि केराना, तसेच महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघात झालेल्या पोट निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. या मतदार संघात भाजपाने पुन्हा एकदा मुसंडी मारली. त्यामुळे विरोधकांची एकी करून लढण्याची चाल फसल्याचे चित्र आहे.
 

 
 
उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड असलेल्या गोरखपूर मतदारसंघात गेल्या वर्षी बसपाच्या पािंठब्यावर सपाच्या उमेदवाराने विजय मिळवला होता. मात्र, या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रवी किशन यांनी विजयाची नोंद केली. फुलपूर मतदारसंघात देखील तेच घडले. सपाच्या नागेंद्र यादव यांनी पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. आता मात्र भाजपाच्या केशरी देवी पटेलने येथे विजय मिळवून हा मतदारसंघ भाजपाला मिळवून दिला. केरानामध्ये देखील भाजपाच्या प्रदीप कुमार यांनी सपा-बसपा युतीच्या तबस्सुम हसनचा पराभव केला.
भंडारा-गोंदिया मतदार संघात तत्कालिन विद्यमान खासदार नाना पटोले यांनी भाजपा सोडून कॉंग्रेस प्रवेश केल्यामुळे राजीनामा दिला होता. त्यामुळे तेथे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मधुकर कुकडे विजयी झाले होते. आता मात्र भाजपाच्या सुनील मेंढे या नवोदित व तरुण नेत्याने तेथे बाजी मारली आहे.