News Update- मोहाळा हत्या प्रकरण

    दिनांक :25-May-2019
मोहाळ्यातील हत्येप्रकरणी आरोपींचा कसून शोध सुरु
एका आरोपीला अटक
अखेर मृतकावर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
ही हत्या राजकिय वादातून नसल्याचा पोलिसांचा खुलासा
निवडणूकांच्या काळात वादांचा मोहाळ्याचा इतिहास
 
अकोट : मोहाळ्यातील भाजप कार्यकर्ता मतीन खां शेर खाँ पटेल(४८) यांच्या हत्येप्रकरणी एक फरार आरोपी इस्ताकउल्ला खाँ अशफाकउल्ला खाँ पटेल याला देवरी-तेल्हारा मार्गावर शनिवार सकाळी ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली. त्यामुळे इतर नऊ फरार आरोपीही लवकर पकडल्या जातील अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.आरोपींना पकडण्यासाठी गठीत करण्यात आलेली पोलिस पथके प्रयत्नांची शर्थ करत आहेत.
दरम्यान आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मोहाळा येथे मृतक मतीन पटेलवर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार उरकण्यात आले. या हत्याकांडातील गंभीर जखमी मुमताज खाँ मिया खाँ पटेल (५५) यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या प्रकरणात हिदायत पटेल यांच्या गटाकडूनही काऊंटर तक्रार पोलिसात दाखल होण्याची शक्यता आहे. ग्रामीण पोलिसांनी ही हत्या राजकिय वादातून झाल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून ही घटना घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्राप्त माहितीनुसार कबुतरांना लहान मुले दाणा-पाणी करत असतांना कुणीतरी दगडं मारले. त्यानंतर वाद सुरु झाला. लहान मुलांच्या या वादात पूढे मोठ्यांनी उडी घेतली आणि नंतर दोन गटात झालेल्या हाणामारीत राजकिय वचपा काढण्याचा प्रयत्न झाला,अशी हकिकत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात अधिक सखोल तपास करण्याची गरज व्यक्त होत आहे.
 
 
मोहाळा गावात काँग्रेस नेते हिदायत पटेल आणि गाझी पटेल असे दोन गट सक्रिय आहेत.या दोन्ही गटात वाद असल्याचे बोलले जाते. यावेळी निवडणूकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या हिदायत पटेल यांना उमेदवारीची लॉटरी लागली. परंतू मोहाळा गावातून भाजपला मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याची जनचर्चा आहे.त्यामुळेच की काय हिदायत पटेल यांचा गट संतापाच्या अग्नीत आतून धूमसत होता.त्याचा वचपा कबुतराच्या वादातून पडलेल्या ठिणगी नंतर या हत्याकांडाच्या रुपाने निघाला,अशी शक्यता काही जण व्यक्त करत आहेत.
मागील काही वर्षांच्या कालावधीत मोहाळ्याशी संबंधित विविध निवडणूकांच्या दरम्यान अनेक वेळा वाद उसळल्याचा इतिहास असल्याची माहिती सुत्रांनी दिली.अन्यथा एका काळात या मुस्लीम बहूल लोकवस्ती असलेल्या गावाला आदर्श ग्रामचा शासकिय पुरस्कार लाभला होता.गोदरीमुक्त ग्राम म्हणून हे गाव सर्वत्र विख्यात होते.परंतू आज या हत्याकांडाच्या रुपाने मोहाळ्याला कूप्रसिध्दीचा सामना करावा लागत आहे.
मोहाळ्यातील हत्याकांडानंतर काँग्रेस नेते हिदायत पटेलसह १० ही आरोपी अज्ञातवासात गेले.त्यामुळे जो पर्यंत पोलिस यंत्रणा सर्व आरोपींना पकडून आमच्या समोर आणत नाही;तो पर्यत मृतकाचे अंत्यसंस्कार होणार नाहीत,अशी भूमिका मृतकाच्या नातेवाईकांनी प्रारंभी काही काळ घेतली होती.त्यामुळे शवविच्छेदनानंतर मृतदेह स्विकारण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता.परंतू या नातेवाईकांचे मन वळविण्यात ठाणेदार ज्ञानोबा फड व ग्रामीण पोलिस अखेर यशस्वी झाले.त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्विकारल्यावर मृतकावर अंत्यसंस्कार पार पडू शकले.