ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या मालिकेचा कुणी तितका विचार करू नये : चहल

    दिनांक :25-May-2019
नवी दिल्ली,
 
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान त्यांच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीचा यशस्वी सामना केला असला, तरी तेवढय़ा एकमेव मालिकेतील कामगिरीचा कोणताही विपरीत परिणाम विश्वचषकात होणार नसल्याचा विश्वास भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल याने व्यक्त केला.
 
 
 
 

 
 
 
 
 
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतरदेखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध चहलला केवळ एकाच सामन्यात संधी मिळाली होती. त्या सामन्यात भारताच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फटका त्याला बसला. अ‍ॅश्टन टर्नरने त्याच्या गोलंदाजीचे पृथक्करण बिघडवून सामना खेचून नेला होता.
‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या मालिकेचा कुणी तितका विचार करू नये, असे मला वाटते. आम्ही त्यांच्याविरुद्ध पुरेसे सामने खेळलो असून प्रत्येक सामन्यात तुम्ही जिंकू शकत नाही. त्यांनी ज्या प्रकारे खेळ केला, ते बघून त्यांचे कौतुक करायला हवे. तसेच पुढील सामन्यात आम्ही त्यापेक्षाही अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करायला हवा,’’ असे चहलने सांगितले.
‘‘मला आणि कुलदीप यादवला दोघांना खेळवायचे की कुणा एकाला घ्यायचे तो निर्णय संघाच्या आवश्यकतेनुसार घेतला जातो. फलंदाजीसाठी पोषक अशा बनवण्यात आलेल्या इंग्लंडच्या खेळपट्टय़ांची आम्हाला चिंता नाही,’’ असे चहलने सांगितले.