विश्वचषक स्पर्धेदरम्यान पत्नी नको; पाक क्रिकेट मंडळाचा खेळाडूंसाठी फतवा

    दिनांक :25-May-2019
लाहोर, 
 
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांवर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी या दौर्‍यात पत्नीला सोबत ठेवू नका, असा फतवा पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आपल्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंसाठी काढला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या यजमानपदाखाली येत्या 30 मे पासून सुरू होत असलेल्या स्पर्धेदरम्यान पाकिस्तान संघातील खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नीकिंवा कुटुंबातील सदस्य दिसणार नाहीत.
 
 
 
 

 
 
 
 
 
 
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेनंतर मंडळाने हा फतवा जारी केला आहे. या मालिकेदरम्यान पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आपल्या खेळाडूंना पत्नीकिंवा कुटुंबातील सदस्यांना सोबत नेण्याची परवानगी दिली होती. मालिकेत पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नव्हता.
 
आता मात्र या स्पर्धेदरम्यान खेळाडूंना आपली पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांना सोबत ठेवता येणार नाही किंवा इतरत्र नेता येणार नाही. त्यांना जर यायची इच्छा असेल तर त्यांना आपली व्यवस्था स्वत:च करावी लागणार आहे, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
 
हॅरिस सोहेल वगळून पाकिस्तान संघातील सर्व खेळाडूंसाठी हा फतवा राहणार आहे. सोहेल याला वैयक्तिक कारणामुळे परवानगी देण्यात आली आहे.
 
याआधी पाकिस्तानच्या खेळाडूंनी मंडळाकडे विनंती केली तर त्यांची विनंती मान्य करून पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांना खेळाडूंच्या खोलीत राहण्यासाठी परवानगी दिली जात होती. आता मात्र नवीन धोरणानुसार ते शक्य राहणार नाही.
 
इंग्लंडच्या दौर्‍यात पाकिस्तान संघाला पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी मात खावी लागली होती. त्यातूनच पाक मंडळाने धडा घेऊन हा नवीन फतवा जारी केला असावा. दरम्यान, विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानचा पहिला सामना 31 मे रोजी नॉिंटघम येथे वेस्ट इंडीजविरुद्ध होणार आहे.