कपिल देव यांच्या घरी राहून रणवीर गिरवतोय क्रिकेटचे धडे

    दिनांक :25-May-2019
रणवीर सिंग सध्या ’83’ या नवीन चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. क्रिकेटवर आधारित ’83’ या बिग बजेट चित्रपटात तो काम करत असून त्यासाठी माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या घरी राहून त्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवण्याचं भाग्य रणवीरला लाभलं आहे. १९८३च्या विश्वचषक विजेत्या टीमकडून क्रिकेटविषयक गोष्टी शिकण्याची अपूर्व संधी रणवीरला मिळाली आहे.या चित्रपटाची तयारी करण्यासाठी रणवीर कपिल देव यांच्या घरी जवळपास दहा दिवस राहिला.या अनुभवाबाबत रणवीरला विचारले असता तो म्हणाला की, “मी कपिल सरांचा कायमच ऋणी आहे. त्यांच्यामुळे मला व्यक्तिरेखेचा जवळून अभ्यास करता आला. त्यांच्या कुटुंबीयांनी सुद्धा मला खूप मदत केली.”

 
झोया अख्तरने दिग्दर्शित केलेल्या ‘गली बॉय’ चित्रपटातील भूमिकेसाठी रणवीरचे खूप कौतुक झाले होते. त्यानंतर सध्या रणवीर कबीर खान दिग्दर्शित ’83 या चित्रपटावर काम करत असून १० एप्रिल २०२० ला हा चित्रपट हिंदी,तामिळ,तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रकाशित होणार आहे. कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ साली भारतीय संघाने विश्वचषक कसा जिंकला ही कथा या चित्रपटात आहे. यामध्ये रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी रणवीरने कपिल देव त्याला देत असलेल्या क्रिकेटच्या धड्यांविषयीचं मत व्यक्त केलं.”त्यांच्यासोबत राहणं आणि त्यांच्याकडून ट्रेनिंग घेणं या गोष्टी वेगळ्या आहेत.कपिल सरांसोबत राहिल्यामुळे मला भूमिका नीट समजून घेता आली. आधी मला जी भीती वाटत होती ती आता नक्कीच कमी झाली आहे.”असंही रणवीर म्हणाला.हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे रणवीरचे ट्रेनिंग सुरु आहे.
रणवीरने कपिल सरांसोबत गप्पा मारतानाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. कपिल सरांची कोणती गोष्ट शिकायला खूप कठीण आहे असं रणवीरला विचारल्यानंतर, “कपिल सरांची गोलंदाजी” असं उत्तर त्याने दिलं.” त्यांची गोलंदाजीची पद्धत खूप अनोखी आहे.”असंही तो म्हणाला. कपिल देव यांच्यासारख्या महान खेळाडूची भूमिका रणवीर कसा निभावतो हे बघणे उत्सुकतेचे आहे.