लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीने भावुक झाला सलमान खान

    दिनांक :25-May-2019
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीने भावुक झाला सलमान खानलक्ष्मीकांत बेर्डे हे केवळ मराठीतील सुपरस्टार नव्हते. तर त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांसोबत काम केले. तसेच हिंदी चित्रपटांमध्ये नायका इतक्याच महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. सलमान खान सोबत तर त्यांनी साजन, मैंने प्यार किया, हम आपके है कौन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि विशेष म्हणजे यातील त्यांचे अनेक चित्रपट प्रचंड गाजले. साजन, मैंने प्यार किया, हम आपके है कौन या चित्रपटांमध्ये सलमानच्या अभिनयासोबतच लक्ष्मीकांत यांच्या अभिनयाचे देखील प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते.

सलमान खान सध्या भारत या त्याच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटात कतरिना कैफ त्याची नायिका आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो नुकताच एका रिअॅलिटी शोच्या सेटवर गेला होता. त्यावेळी त्या शो मधील एका स्पर्धकाने साजन या चित्रपटातील तुमसे मिलने की तमन्ना है या गाण्यावर नृत्य सादर केले. हा परफॉर्मन्स पाहाताना सलमान भावुक झाला आणि त्याने लक्ष्मीकांत यांच्या आठवणींना उजाळा दिला.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींविषयी सांगताना सलमान म्हणाला, साजन चित्रपटातील तुमसे मिलने की तमन्ना है या गाण्यात माझ्यासोबत लक्ष्मीकांत होते. या गाण्याच्या त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्यासोबत मी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. याच चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान आम्ही दोघे एकमेंकाचे खूप चांगले फ्रेंड्स झालो होतो. साजन प्रमाणेच मैंने प्यार किया हा चित्रपट सुपरहिट होण्यामागे लक्ष्मीकांत यांचा मोलाचा वाटा आहे. साजन, मैंने प्यार किया या चित्रपटांमुळे नेहमीच मला लक्ष्मीकांत यांची आठवण येते. दुर्दैवाने आज ते आपल्यात नाहीत.
मैंने प्यार किया या चित्रपटाप्रमाणेच हम आपके है कौन या चित्रपटातील सलमान आणि लक्ष्मीकांत यांची जोडी प्रेक्षकांना भावली होती. साजन, मैंने प्यार किया, हम आपके है कौन या सगळ्याच चित्रपटांमधील लक्ष्मीकांत यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.