जिंकलो नसलो, तरी मी अजून हरलो नाही- शरद पवार

    दिनांक :25-May-2019
शरद पवारांची भावनिक पोस्ट
 
 मुंबई: लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी समाज माध्यमावर, मी जिंकलो नसलो... तरी हरलो नाही, या आशयाची पोस्ट टाकून कार्यकर्त्यांना न खचण्याचे आवाहन केले आहे.
 

 
 
पार्थ पवारांच्या मावळमधील पराभवाने पवारांच्या कुटुंबाने पहिल्यांदाच हार पाहिली आहे. पवारांचा बालेकिल्ला असलेला बारामती मतदारसंघ राष्ट्रवादीला राखता आला. मात्र, भाजपाच्या कांचन कुल यांनी कडवी झुंज दिली. त्यामुळेच थकलो आहे जरी, तरी अजून झुकलो नाही आणि जिंकलो नसलो, तरी मी अजून हरलो नाही, अशा आशयाची ही पोस्ट पवारांनी टाकली आहे.
शरद पवारांनी आपला नातू पार्थ पवार यांच्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली होती. पार्थ पवार यांना लोकसभेसाठी मावळमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, श्रीरंग बारणेंनी पार्थ पवारांचा पराभव करीत आपली खासदारकी कायम ठेवली आहे.
शरद पवार यांची राजकीय कारकीर्द तब्बल 50 वर्षांची आहे. आतापर्यंत लढलेल्या 14 ते 15 निवडणुकीत माझा एकदाही पराभव झालेला नाही, असे स्वत: शरद पवार सांगतात. पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि पुतणे अजित पवार यांनीही पराभव पाहिला नाही. परंतु, पार्थ पवार यांच्या रुपाने पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाची चव चाखावी लागली आहे.