साहेब, लावायचा का व्हिडीओ...?

    दिनांक :25-May-2019
चौफेर   
 सुनील कुहीकर 
 
राजसाहेब! आहात कुठे? दिसला नाहीत गेले दोन दिवस कुठेच! निवडणुकीपूर्वी प्रचारार्थ केलेल्या दौर्‍याचा शीण अजून गेला नाही वाटते! की, निवडणुकीचे निकाल ऐकून तब्येत बिघडलीय्‌ आणखी? काय तो तोरा होता राव तुमचा! किती चवताळून उठला होतात पंतप्रधानांविरुद्ध. किती आरोप. किती शिवीगाळ. आपण केलेल्या आरोपांना कुणी काडीचीही किंमत देत नाहीय्‌ म्हटल्यावर झालेला त्रागा तो केवढा. आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलण्याचीही कुणाची बिशाद राहिली नसल्याची ती शेखी. ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत गाजवलेल्या जाहीरसभांचा घाट. स्वत:च्या राजकीय पक्षाचा एकही उमेदवार मैदानात नसताना, सरकारविरुद्ध रान पेटवण्यासाठी कुणी ‘प्रोत्साहन’ दिले, असा नुसता सवाल विचारला गेला तरी केवढे चिडला होतात. कॉलर टाईट करून म्हणालात, ‘‘मी असल्या सुपार्‍या घेत नसतो.
 
मोदींच्या नेतृत्वात देश संकटात चालला असताना त्याबाबत जनजागृती करणे हे माझे कर्तव्य आहे.’’ त्याचा अप्रत्यक्ष ‘लाभ’ काँग्रेस-राष्ट्रवादीला होणार असेल, तर होऊ दे! त्याला जबाबदार मी नाही. पण, अशा कठीण प्रसंगात लोकांना परिस्थितीची जाणीव करून देणं, त्यांना जागृत करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं केवढं ठामपणे सांगितलं होतं राव तुम्ही? केवढ्या गाजल्या त्या जाहीरसभा. काय तो जल्लोश. केवढा हुरूप लोकांना तुमच्या जाहीरसभांना येण्याचा. पण, तुमच्या अपेक्षेप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीला ‘फायदा’ मात्र झालेला दिसत नाही कुठेच. नरेंद्र मोदींविरुद्ध तुम्ही केलेल्या थयथयाटावर, व्यक्त केलेल्या जळफळाटावर, ओकलेल्या गरळीवर टाळ्या पिटल्या खर्‍या लोकांनी, पण प्रत्यक्षात मतांचे दान मात्र युतीच्याच पदरात टाकले. म्हणजे झालं कसं बघा, लोक आले. त्यांनी तुमचा ‘शो’ पाहिला. त्यांना तो आवडला. लोकांनी टाळ्याही वाजवल्या. जमेल तिथे जमेल तसा हशाही पिकला. घरी परतले. अन्‌ विसरून गेले... पाऽऽर ‘एण्टरटेनमेंट शो’ करून टाकला बघा लोकांनी तुमच्या जाहीरसभांचा... 

 
 
सहज घडलं असेल असं? की तुमचा छुपा डाव लक्षात आला असेल जनतेच्या? निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुमच्या मनात अचानक जागलेला जनतेबद्दलचा कळवळा छद्मी असल्याची खात्री पटली असेल लोकांना? दर दोन-चार वर्षांनी बदलणारी तुमची भूमिकाही ध्यानात ठेवली असेल का लोकांनी? कधीकाळी बाळासाहेबांच्या छत्रछायेत तयार झालेलं, धनुष्यबाणासाठी प्राणपणानं मत मागणारं नेतृत्व, स्वत:वरील व्यक्तिगत अन्यायाचा जाहीर कांगावा करीत रेल्वे इंजिनसाठी मतांचे दान केव्हा मागू लागले, ते कळलेच नाही जनतेलाही. नंतरच्या काळात आणखीच कहर होत गेला. एका राजकीय पक्षाचा प्रमुख नेता तिसर्‍याच कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला मतं देण्याची गळ घालतो अन्‌ नंतरच्याच निवडणुकीत त्या पक्षाला अजीबात मतं देऊ नका म्हणून सांगतो, असे अफलातून चित्र निर्माण करण्यात राजसाहेबांचे कसब पणाला लागले! राजसाहेब, वर्षागणिक भूमिका बदलणं, आपल्या पक्षाची ताकद दरवेळी कुणाच्यातरी खुंट्याला बांधणं, ही तुमची राजकीय अपरिहार्यता असेलही कदाचित, पण म्हणून जनतेला गृहीत धरून तिलाही स्वत:सोबत फरफटत नेत, कुणाच्यातरी दावणीला बांधण्याची तुमची तर्‍हा लोकांनी का स्वीकारायची, हे तरी सांगा!
 
तमाम जनतेला दूधखुळ्यांच्या रांगेत बसवून स्वार्थाचे राजकारण करायला निघाला होतात. मोदींनी पाच वर्षांत काहीच केलं नाही म्हणून सांगत होतात. नोटबंदी फसली काय, जीएसटीचे दुष्परिणाम भोगावे लागणार काय, सरकारच्या अपयशाची लक्तरं वेशीवर टांगण्याचा तो आवेश काय, पाच वर्षांत देश खड्‌ड्यात घातल्याचा आरोप काय... निदान डझनभर सभा घेतल्यात साहेब आपण महिनाभरात जनजागृतीचे कारण पुढे करून. जागृत झालेच नाहीत का हो लोक आपल्या प्रभावाने? कारण, निवडणुकीच्या निकालातून तरी तसे काही दिसत नाही. की हवेत भिरकावलेत लोकांनी तुमचे आरोप अन्‌ खड्‌ड्यात घातलीत तुमची मतं?
 
इथे प्रत्येकाच्या राजकारणाची एक तर्‍हा आहे. जे जाहीरसभेत बोललं जाते ते ण्टीचेंबरमध्ये बोललं जाईलच याची खात्री नसते. नेत्यांच्या बोलण्या-वागण्यातील तफावतीचाही सराव झालाय्‌ एव्हाना लोकांना. निवडणुकीच्या काळातील आश्वासनांची वासलात तर सवयीचा भाग झालीय्‌ त्यांच्या. बहुधा त्यामुळेच की काय, पण सरड्यांहून अधिक वेगाने रंग बदलण्याची राजकारण्यांची तर्‍हा आश्चर्याचा विषय राहिलेला नाही आताशा. कित्येकदा, बड्या लोकांची ही पद्धत आकलनापलीकडची असते सर्वसामान्य जनतेच्या. पण... एक मात्र नक्की. तिला पाहिजे तेव्हा, पाहिजे तसे आपल्या तालावर नाचवू शकतो, असा माज जर कुणाच्या डोक्यात शिरला असेल, तर तो लागलीच उतरवण्याचा बाणाही असतो साहेब जनतेच्या अंगी. आता हेच बघा ना! एवढ्या जाहीरसभा घेऊन, मोदींना मतं देऊ नका असं सांगूनही कुणी भीक घातली तुमच्या आवाहनाला? ‘ते’ देश खड्‌ड्यात घालत असल्याचे लाख सांगून पाहिलं तुम्ही, पण कुणी विश्वास नाही ठेवला नाही बघा. तुम्ही नको म्हटलं तरी भरभरून मतांचं दान त्यांच्या पदरात टाकलं मतदारांनी. लोकांना मूर्ख समजून ज्यांना छुपी मदत करायला निघाला होतात, त्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोणचे घातले जनतेने अन्‌ तुमचं तर पाऽऽर भरीत केलं की हो!
 
राजसाहेब, खरं सांगायचं तर त्या जाहीरसभांमधून तुम्ही मांडलेले सारेच मुद्दे अगदीच खोडून काढावेत असे नव्हते. शिवाय सरकारच्या चुकांवर बोट ठेवणे हा तर विरोधी पक्षाचा, लोकशाहीव्यवस्थेने बहाल केलेला अधिकार. त्यामुळे तुम्ही सरकारवर टीका करण्यात, नरेंद्र मोदींवर तुटून पडण्यात तसे गैर नव्हतेच काही. मग तरीही लोकांनी केराची टोपली का दाखवली तुमच्या आवाहनाला? भाषणांनंतर टाळ्यांचा कडकडाट करूनही मतदान केंद्रांवर कमळावरच बोट का ठेवले असेल लोकांनी, ठाऊकाय्‌? कारण राजसाहेब, लोकांनी तुमचा डाव ओळखला होता. त्यांच्या मतांचा तुम्ही बाजार मांडायला निघाले असल्याचे त्यांनी पुरते जाणले होते. दरवेळी वेगवेगळ्या लोकांसाठी मतं मागण्याची ठाकरी शैली तशीही भावली नव्हतीच कुणाला. यंदाही, एकवेळ स्वत:च्या पक्षासाठी मतं मागायला मैदानात उतरला असता ना, तरीही कदाचित लोक काही प्रमाणात पाठीशी उभे राहिले असते तुमच्या. पण, तुम्ही तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधून घेतले होते स्वत:ला. स्वत:च्या स्वार्थासाठी जनमताचा लिलाव मांडायला निघालात.
 
लोक मोठ्या विश्वासाने आपल्या पाठीशी उभे राहतात म्हणून त्यांना गृहीत धरण्याची चूक करून बसलात. राजसाहेब, जनता, तुम्ही समजता तेवढीही खुळी नाही हो! तिला व्यवस्थितपणे कळते कुणाच्या वागण्या-बोलण्यातून काय अर्थ काढायचा ते. आपल्या भाषण मोहिमेचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होणार असेल तर होऊ दे, असे म्हणून तुम्ही स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा लाख प्रयत्न केला, तरी लोकांना चांगलेच ठाऊक झाले होते की, राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीची सुपारी घेऊनच मैदानात उतरले आहेत. अप्रत्यक्ष रीत्या नव्हे, प्रत्यक्षपणे त्यांना लाभ मिळवून देण्यासाठीच राजसाहेबांची धडपड चालली आहे. त्यासाठीच त्यांचे इंजीन दिशाहीन भरकटत चालले असल्याची बाबही लपून राहिलेली नव्हतीच कुणाच्याही नजरेतून. तुमच्या लेखी तर काय, सर्वसामान्य माणसं म्हणजे मतदानापुरते गोंजारण्याचे साधन. त्यांना केव्हाही, कसेही मूर्ख बनवता येते. हो ना? असेच वाटले होते ना राजसाहेब तुम्हाला?
 
 पण कसचे काय, या सर्वसामान्य बापुड्यांनी पुरती वाट लावली बघा साहेब तुमची! ज्यांना सत्तेतून बाहेर घालवण्याच्या बाता करत होता, तुमच्या भाषणावर टाळ्या पिटणार्‍यांनी त्या मोदींनाच पुन्हा सत्ता बहाल केली आहे. तीही एकहाती. तुमच्या नाकावर टिच्चून. तुम्ही केलेले सारे आरोप कचर्‍याच्या टोपलीत टाकून. तुम्ही ज्यांना पडद्याआडून मदत करायला निघाला होतात, त्या सर्वांचे खोबरे करून. तुम्हाला तर तोंड दाखवायलाही जागा ठेवली नाही बघा साहेब लोकांनी! खरंच कमाल आहे बरं लोकांची. गर्दी तुमच्या सभेला करतात. टाळ्या तुमच्या भाषणावर ठोकतात अन्‌ मतं तेवढी मोदींना देतात...! बरं, पण साहेब, जाता जाता तेवढं सांगून द्या! तो व्हिडीओ लावायची इच्छा बाकी आहे अजून? की...
 
9860613872