तुडका येथे अग्नीतांडव

    दिनांक :25-May-2019
तीन घरांसह वासरू, शेळ्या, दुचाकी जळून खाक
 
 देव्हाडा/मोहाडी,
तुमसर तालुक्यातील तुडका येथे आज 25 रोजी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास भिषण अग्नीतांडव घडून तीन घरांची राखरांगोळी झाली. यात मधुकर वाडीभस्मे, रोशन पंधरे, नंदराम भिवगडे यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले.
 

 
 
तुडका येथील रहिवासी मधुकर वाडीभस्मे यांच्या घरातील विद्युत मीटरला शॉर्टसर्कीट होऊन आग लागल्याचे सांगितले जाते. तीव्र उष्णतेने पाहता पाहता आगीने उग्ररूप धारण करून लगतच्या पंधरे व भिवगडे यांच्या घरालाही आपल्या कवेत घेतले. वाडीभस्मे यांच्या घराच्या भिंतीलगत गोठ्यातील गायींचे दावे तोडून त्यांना वाचविण्यात यश आले. परंतु दोन वासरू व सहा शेळ्या आगीच्या ज्वाळांमध्ये अडकल्याने त्यांचा भाजून मृत्यू झाला. तसेच एक मोटारसायकल व एक सायकल, अंगणात असलेली  जनरल साहित्य विक्रीचे दुकान जळून खाक झाले. वा-यामुळे शेजारच्या पंधरे यांच्या घरालाही आग लागली. तर रस्त्याच्या पलिकडे असलेल्या भिवगडे यांच्या घराचेही नुकसान झाले. ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. ब-याच वेळाने अग्नीशामक वाहन आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र तोपर्यंत लाखोचे नुकसान झाले होते. पोलिस पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला असून नुकसानग्रस्त कुटूंबियांना शासनाने तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.