नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी दोघांना अटक

    दिनांक :25-May-2019
मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात सीबीआयने शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे अशी आरोपींची नावे आहेत. संजीव पुनाळेकर हे सनातनचे वकील आहेत.  संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर पुरावे नष्ट करणे, हत्येच्या कटामध्ये समाविष्ट असणे आणि आरोपींना मार्गदर्शन करणे असे तीन आरोप आहेत. तर विक्रम भावे याच्यावर नरेंद्र दाभोलकर कोण आहेत हे दाखवणे, दाभोलकर कोण होते याची माहिती देणे आणि कटात सहभागी असणे हे तीन आरोप आहेत. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आधीच अटकेत असलेल्या शरद कळसकरने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांनी दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले  पिस्तुल नष्ट करण्यासाठी मदत केली होती. त्याचबरोबर हत्येवेळी दाभोलकरांची ओळख पटवण्यात विक्रम भावेचा सहभाग होता. अंधश्रद्धा आणि बुवाबाजी यासारख्या अनिष्ट रुढी परंपरांविरुद्ध लढणारे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. राज्य पोलीस आणि सीबीआयचे पथक या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते. पाच वर्ष या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नव्हती. मागच्यावर्षी केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभाग सीबीआयने सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक केली होती. नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले. सचिन आणि शरद दोघे मित्र आहेत. एटीएसने औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतले. त्याचा गुन्ह्यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला अटक करुन सीबीआयकडे सोपवण्यात आले.