तळातल्या खेळाडूंनी फलंदाजीची जबाबदारी घेणे गरजेचे : विराट कोहली

    दिनांक :26-May-2019
विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ५ जून रोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. मात्र त्याआधी झालेल्या पहिल्याच सराव सामन्यात भारताची फलंदाजी कोलमडली. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली हे भारताचे बिनीचे शिलेदार न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात झटपट माघारी परतले. चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेला लोकेश राहुलही फारशी चमक दाखवू शकला नाही. भारताकडून मधल्या फळीत हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी थोडीफार झुंज दिली. या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आपल्या तळातल्या फळीतल्या खेळाडूंकडून फलंदाजीमध्येही आपला दमखम दाखवावा अशी अपेक्षा केली आहे.
 
 
 

 
 
 
“विश्वचषकासारख्या स्पर्धेत कधीकधी तुमचे सुरुवातीच्या फळीतले फलंदाज हे अपयशी ठरतात. अशावेळी तळातल्या खेळाडूंनी फलंदाजीची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. पहिल्या सराव सामन्यात आम्ही ठरवलेल्या गोष्टी मैदानात घडून आल्याच नाहीत. मात्र मधल्या फळीत हार्दिक, जाडेजा, धोनीने काही धावा काढल्या ही आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे. ४/५० या धावसंख्येवरुन १७९ पर्यंत मजल मारणे ही माझ्यासाठी आश्वासक बाब आहे.” सामना संपल्यानंतर विराट कोहलीने आपले मत मांडले.