कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावी उत्तरेकडे!

    दिनांक :26-May-2019
शास्ताखानावरील अकल्पित छापा हा खानासकट औरंगजेबाचीही झोप उडविणारा ठरला. शिवाजी राजांची निर्भयता किती उच्च कोटीची असावी, याचा अंदाज इथे येतो. हा छापा शिवाजीराजांच्या शास्त्रशुद्ध युद्धतंत्राचा उत्कृष्ट नमुना होता. राजांना स्वतःच्या सामरिक शक्तीच्या मर्यादा माहिती होत्या. त्यामुळे समोरासमोरच्या लढाईमध्ये खानाच्या फौजेला आव्हान देणे, हा मूर्खपणा ठरला असता. पण राजांनी युद्धाच्याच पवित्र्यात उभ्या असलेल्या खानाच्या छावणीमध्ये शिरून त्या अवाढव्य मोगल सेनेच्या अधिपतीवर घाला घातला अन खानाला पुण्यातून दूर केले. शक्तिकेंद्रावरच आक्रमण झाल्याने आणि आपला नेताच दृष्टिआड झाल्याने त्या विशाल फौजेची अवस्था वारा निघून गेलेल्या शिडाप्रमाणे झाली. 1659 च्या अफझलखानाच्या आक्रमणापासूनच स्वराज्य प्राणांतिक संकटांनी घेतल्या गेलेले होते. त्यातच 1660 पासून पुढचे तीन वर्षे खानाचे संकट मृत्यूप्रमाणे स्वराज्यावर घिरट्या घालत होते. या काळात स्वराज्याची अपरिमित हानी झाली होती, कोष आटले होते. शिवाय शास्ताखानावरील आक्रमाणामुळे चिडलेला औरंगजेब बदला घेण्याच्या दृष्टीने काही ना काही हालचाल निश्चित करेल, हा राजांचा कयास होता. भविष्यातील त्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी निधीची प्रचंड आवश्यकता होती. कमीत कमी वेळात जास्तीतजास्त लूट कुठून प्राप्त करता येईल, हा विचार आता राजांच्या मनात घोळत होता.
 
 
 
मुळात त्या काळात सर्व आक्रमणांमध्ये लूट अवश्यमेव विषय असायचा. कारण परप्रांतांवर काढल्या जाणार्‍या मोहिमांचा खर्च राजसत्तांना परवडणारा नसायचा, त्यामुळे आक्रमण करताना त्या प्रांतातील लोकांवर, त्यांच्या संपत्तीवर सरळ सरळ आक्रमण केले जात असे. ही परिपाठीच पडली असल्यानं जनतासुद्धा जागरूक झाली होती. असे एखादे सैन्य आपल्या गावाकडून जात असल्याची पुसटशी जरी शंका गावाला आली, तरी लोक आपले महत्त्वाचे सामान आणि कुटुंब कबिला घेऊन जंगलात व डोंगराकडे निघून जात. बेसावध गावांना मात्र सातत्याने या लुटीचा जबर मोबदला द्यावा लागे. असे छापे युद्धसमयी पडत असत. पण जेव्हा राजसत्तांना धनाची आपूर्ती करण्यासाठी लूट करावी लागे, ती मात्र अकस्मात छाप्याच्या रूपात पडत असे. तिथे जनता, व्यापारी यांना निसटायला सुद्धा वेळ मिळत नसे. अशा लूटमारीमध्ये थोडा शत्रुभाव असला, तरी सामान्य जनतेविषयी सुडाची भावना नसे. तसेच सारे लक्ष संपत्तीवर केंद्रित केले जात असल्याने यात प्राणहानी विशेष होत नसे. केवळ जे प्रतिकार करतील त्यांच्याविरुद्ध तलवार उचलून शक्य तितक्या लवकर कार्यभाग उरकावा लागत असे. शत्रू पाठीवर येण्याआधी सर्व लूट सुरक्षित स्थळी नेणे हे मोठे कार्य ठरत असे.
  
शिवाजी महाराजांना लुटीची आवश्यकता का पडली, याचा विचार करता दोन गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे उपरोक्त वर्णन केल्याप्रमाणे शास्ताखानाच्या तीन वर्षांच्या जाचामुळे निर्माण झालेली आर्थिक तूट भरून काढणे. त्यासोबतच दुसरे महत्त्वाचे कारण होते- शास्ताखानाला स्वराज्यावर पाठविणार्‍या अन्यायी औरंगजेबाचा उघड उघड बदला घेणे. खानाच्या आक्रमणामुळे आपली शक्ती क्षीण झालेली नसून तुमच्या घरातच नाही तर तुमच्या प्रांतात शिरून आपण लूट करू शकतो, हे मोगलांना दाखविण्यासाठी महाराज आसुसले होते. यास्तव त्यांनी 1663 च्या मध्यात अत्यंत गुप्तपणे बहिर्जी नाईकांकडे जबाबदारी सोपविली. बहिर्जीची माणसे अष्टदिशांना पसरली व माहितीचा ओघ सुरू झाला. त्यातच स्वतः बहिर्जी गुजराथकडे वळला आणि तेथील एका प्रचंड, सुसंपन्न, श्रीमंत शहरात त्याचे पाऊल पडले. तिथली बाजारपेठ, वाडेहुडे, संपन्नता, ऐश्वर्य, मालमत्ता इतकी जबरदस्त होती की जणू ती कुबेराचीच नगरी शोभावी. 17 व्या शतकात तर त्या नगरीचे भाग्य ऐन भरभराटीला आले होते. इथले जकातघर, व्यापारी पेठ, तिजोर्‍या अकूत संपत्तीने भरल्या होत्या. या शहराचे नाव होते- सुरत! होय, सुरत!! जगातील सर्वात व्यस्त अन्‌ महत्त्वाच्या बंदरांपैकी एक, सुरत! मोगलांची सर्वात मोठी बाजारपेठ सुरत! जिला बादशहाची दाढी (शान) समजली जात असे ती, सुरत! आणि मक्केचा दरवाजा म्हणूनही जी ओळखल्या जायची, ती दार-उल-हज सुरत! असे म्हटले जाते की गोपी नावाच्या एका ब्राह्मणाने तापी नदीकाठी या शहराचा शोध लावला. (स्थापना केली?) त्याने शहराचे नाव ठेवले सूर्यपूर अथवा ‘सूरजपूर!’ कर्णवातीपासून 165 मैल तर मुंबईपासून 180 मैल अंतरावर हे शहर वसले आहे. समुद्रकिनार्‍यापासून जवळ असलेल्या या शहरात एक मजबूत किल्लाही होता. बाराव्या अन्‌ पंधराव्या शतकात मुसलमानांनी सूर्यपूरची सातत्याने लूट केली. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनीही सुरतेला वारंवार आगीच्या भक्षस्थानी पाडले. पोर्तुगीज फिरस्ता दुआर्ते बार्बोसा लिहून ठेवतो की- ‘जगातील विविध व्यापारी गलबते या बंदरामध्ये उभी असत. एन्साय्क्लोपीडिया ब्रिटानिकानुसार 1520 पासून या शहराचे नामाभिधान सुरत असे झाल्याचे दिसते.’ 1573 ला अकबराने सुरत मुगल साम्राज्यात आणल्यानंतर मात्र सुरतेची सूरत अजून दिमाखदार झाली. त्यानंतर जवळजवळ शंभर वर्षे हे वैभव चढतं वाढतं राहिलं. इथल्या बाजारपेठा तुर्की, अर्मेनिअन, इंग्लिश, युनानी, पर्शिअन, डच, फ्रेंच इत्यादी व्यापार्‍यांनी समृद्ध असायच्या. संपूर्ण हिंदुस्थानातील प्रमुख व्यापारी आपला माल सुरतेच्याच बंदरातून निर्यात करीत असत. हिरे, मोती, सोने, जडजवाहीर, तांबे, पितळ, कस्तुरी, नक्षिकाम केलेली भांडी, चंदन, मसाल्याचे पदार्थ, हस्तिदंत अशा बेशकिमती वस्तूंचा व्यवहार इथूनच चालत असे. याशिवाय उत्तमोत्तम स्त्रिया आणि गुलामांच्या विक्रीचीही दुर्दैवाने ही मोठीच बाजारपेठ होती.
 
मोगलांच्या तोफखान्याचा युरोपिअन प्रमुख निकोलाव मानूची लिहितो की- ‘‘ज्यावेळी मोगल साम्राज्याचे वार्षिक उत्पन्न 38 कोटी रुपये असायचे, त्या काळात एकटी सुरत फक्त कराच्या स्वरूपात 30 लक्ष रुपये औरंगजेबाच्या पदरात पडत असे.’’ इनायतखान बहादूर हा मुगलांकडून सुरतेचा सुभेदार होता. हा अतिशय क्रूर आणि भ्रष्ट अधिकारी होता. याला 5000 सैनिक ठेवण्याची अनुमती आणि ‘तन्ख्वाह’ होता. पण हा शहाणा फक्त कागदोपत्री 5000 सैनिक ठेवत असे. मुळात केवळ 1000 सैनिकांची तैनाती करून 4000 सैनिकांचा पगार अन्‌ खर्च तो थेट स्वतःच्या खिशात घालत असे. आधी वर्णिल्याप्रमाणे सुरत हे मोगलांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. सर्व व्यापार्‍यांकडून प्रचंड प्रमाणात जकात गोळा होत असल्याने येथील जकातघर नेहमीच धनाच्या राशींनी तुडुंब भरले असायचे. वीरजी व्होरा, कासीम बेग आदी व्यापारी तर इतके संपन्न होते की यांच्या घराच्या भिंतीच सोन्याने मढवायच्या राहिल्या असाव्यात. इथे जशी श्रीमंतांची वस्ती होती, तशीच गरीब कामगारांची वस्ती होती. या वर्गाची मात्र येथे कायम हेळसांड होत असे. अतिशय दारिद्र्य आणि मोगली जाच यामुळे मेटाकुटीला आलेला हा वर्ग व्यापार्‍यांच्या अक्षरशः तुकड्यांवर जगत असे. इतर व्यापार्‍यांच्या नसल्या, तरी इंग्रज अन्‌ डचांनी येथे आपल्या वखारी बांधून घेतल्या होत्या. त्यावर तोफा आणि शिबंदीसुद्धा असे. इथे इंग्रजांचा एक मोठा अधिकारी होता, जॉर्ज ऑक्झेन्डेन. इंग्रजांचा संपूर्ण हिंदुस्थानमधील कारभारही सुरतमधूनच चालत असे. युरोपिअन वसाहतींना स्वाली होल म्हटले जात असे. स्वाली हा सुरत जवळच्या सुआली गावाच्या नावाचा अपभ्रंश आहे.
 
बहिर्जीने ही सारी माहिती काढून आणली. तिथले वैभव आणि संपत्ती त्यानं पाहिली आणि तो मोहरून उठला. बस्स ठरले! नखशिखांत वैभवाने नटलेली ही लक्ष्मी स्वराज्याच्या कार्यातच अर्पण व्हायला हवी. तो परत आला अन्‌ राजांना म्हणाला- ‘‘राजे, सुरत मारिलियास अगणित द्रव्य सापडेल.’’ राजांनी बहिर्जींकडून सुरतेविषयी सर्व माहिती जाणून घेतली अन्‌ तेही हरखून गेले. पण ही गोष्ट अजिबात सोपी नव्हती. राजगडापासून सुरत 285 मैलांवर (460 कि.मी.) होती. पुण्यापलीकडे सर्व प्रांत मुगलांच्या अख्त्यारीमध्ये होता. एवढी मोठी लूट करायची तर सुरक्षेसाठी सोबत सैन्य तर हवेच पण माल वाहून आणायला रिकामे घोडे अथवा बैल आवश्यक होते. यासोबतच माल बांधायला, ने-आण करायला मोठ्या प्रमाणात कामगारांची आवश्यकता होती. इतका मोठा लवाजमा घेऊन मोगली प्रांतातून जाणे अत्यंत धोक्याचे होते. सिंहगडाजवळ जसवंतिंसह राठोड वेढा घालून बसला होता. त्याला पुसटशी जरी कल्पना आली तर आधीच लढाई सुरू होण्याची शक्यता होती. दिवसा इतके मोठे सैन्य एकत्र प्रवास करायला लागले तर मोहिमेची गुप्तता संपणार होती. इतकेच नव्हे, तर सुरतेला पोहोचण्याआधीच जर शिवाजी आक्रमण करतो आहे, ही बातमी फुटली, तर सारी सुरत सावध होऊन संपत्तीसह पलायन करण्याची शक्यता होतीच. इंग्रज अधिकारी व्होल्कार्ड इव्हर्सन लिहितो की- ‘‘महाराजांकडे दहा हजार लष्कर होते.’’ शिवरायांचा पोर्तुगीज चरित्रकार कॉस्मा-द-गार्दा लिहितो की- ‘‘राजे 8000 घोडदळ व 3000 पायदळ घेऊन सुरतेवर चालून गेले होते.’’ याचाच अर्थ साधारण आठ ते दहा हजार फौज राजांसोबत राहणार होती. इतकी मोठी सेना सोबत असताना गोपनीयता हा फार मोठा प्रश्न असतो. शककर्ते ‘शिवराय’मध्ये श्री. विजयराव देशमुख लिहितात की- ‘‘राजांचा प्रवासाचा वेग दिवसाकाठी 8 मैल होता.’’ तसेच अॅबेे कॅरे या फ्रेंच माणसाच्या वर्णनानुसार यावेळी महाराजांनी केवळ रात्रीच प्रवास केला. दिवसा आपल्या हालचालींचा सुगावा लागू नये, म्हणून ते जंगलांमध्ये दडून राहत. राजांचा नेहमीचा शिरस्ता हा वेगाने प्रवास करण्याचा होता, पण या मोहिमेची संवेदनशीलता जाणून कदाचित त्यांनी केलेला हा बदल असावा. ऐन शत्रूच्या प्रांतात जवळपास तीनशे मैलांची ही चढाई राजांच्या आजपर्यंतच्या मोहिमांमधली सर्वोच्च मोहीम ठरणार होती. राजांनी केलेल्या एकूण तयारीवरूनही या मोहिमेचा व तिच्या अनिवार्यतेचा अंदाज बांधता येतो. महाराज यशस्वीपणे सुरतेपर्यंत पोहोचतील की नाही? मध्येच या मोहिमेचा पर्दाफाश तर होणार नाही? सुरतेची लूट निर्विघ्नपणे पार पडेल का? सारी लूट सहीसलामत स्वराज्यापर्यंत पोहोचेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराज्याचे बहिश्चर प्राण म्हणजे स्वतः शिवाजी महाराज सुखरूप परत येतील का? असे अनेक प्रश्न स्वराज्याच्या वेदीवर वाट पाहत बसले होते. या प्रश्नांची उत्तरे उत्तरेकडूनच येणार होती. राजांच्या अभेद्य निश्चयाची आणि निर्भेळ महत्त्वाकांक्षेची कोटीच्या कोटी उड्डाणे उत्तरेकडे झेपावली होती. (क्रमशः)
• डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
9923839490
••