'शेकरू' भीमाशंकरचे लेकरू

    दिनांक :26-May-2019
भीमाशंकरचे दर्शन न घेताच आम्ही जंगलाची वाट तुडवायला सुरुवात केली. पक्ष्यांची किलबिल कानाला अन्‌ मनाला साद घालत होती. मध्येच हळू वाहणार्‍या झर्‍याचं गाणंही कानी पडत होतं. भिमाशंकराच्या घनदाट जंगलात झाडांच्या अगणित फांद्या एकमेकात नखशिखांत गुंतलेल्या होत्या. आणि त्यात सूर्यप्रकाशाचे कवडसेच तेवढे जमिनीवर दिसत होते. आमच आठ किलोमीटर अंतर पायी फिरून झालं होतं. अभयारण्य परिसरात इतकी पायपीट करूनही शेकरू दिसण्याचा पत्ताच नव्हता. यासाठी मी खास अमरावतीवरून शेकरूचे दर्शन करण्यासाठी गेलो होतो. पोलिस अधीक्षक नितीन गव्हाळ, विधिज्ञ अमित दुबे व वरिष्ठ अभियंता चंद्रशेखर तायडे असे आम्ही चौघे सकाळीच अभयारण्य परिसरात दाखल झालो होतो. मात्र पायी फिरून फिरून आता सोबतीही कंटाळले होते. पोटातही कावळे ओरडायला लागले. आम्ही गावात परतलो. मंदिराच्या बाहेर दुधाची खीर म्हणून प्रसाद कुणीतरी वाटत होतं. आम्ही चौघांनी दोन दोन प्याले खीर पिऊन भुकेला थोडा दिलासा दिला. आम्ही मंदिराच्या पायरीवर बसलो. आमच्या गप्पा रंगत असतानाच पोटातल्या खिरीने रंग दाखवायला सुरुवात केली. दुधाची खीर प्याल्यामुळे एक एकाला गुंगी येऊन आम्ही पेंगायला लागलो. मात्र माझ्यातला मी मला स्वस्थ बसू देत नव्हतो. मी अन्‌ नितीन आम्ही दोघे पुन्हा जंगलच्या वाटेने निघालो.
 
 
 
भीमाशंकरचा आठवडी बाजार असल्या कारणाने जंगलाच्या पायथ्याच्या गावातील लोकं जंगलातून येजा करत होते. जंगलात काही अंतरावर पायवाटेच्या कडेला चिलीम फुकत बसलेल्या स्थानिक गावकर्‍याला मी सहज विचारलं. ‘‘ओ आप्पा इथे शेकरू आहे ना हो?’’ आप्पाच्या तोंडातून धुरकांडं सुरू असतानाच आप्पांनी मन हलवली. लगेच वरच्या झाडाकडे बोट दाखवत आप्पा हळूच बोलले, ‘‘हे काय हो शेकरू!’’ मी आप्पाच्या बोटाच्या दिशेने नजर वळवली, बघतो तर काय स्वारी मस्त झाडाच्या फांदीवर दोन्ही पाय टाकून झोपली होती. मला क्षणभर विश्वासच बसला नाही. शेकरू पाहून मनात एक वेगळीच आनंदाची लहर पसरली. लहानपणी शाळेच्या पुस्तकात वाचलेला तो हाच शेकरू होता. अनेक दिवसांची शेकरू पाहण्याची सुप्त इच्छा पूर्ण झाली होती. पण गंमत इथेच संपत नाही. पुढे आम्ही मंदिराजवळ परत आलो. दर्शन घेऊन मी पायरीच्या ओट्यावर थोडा आराम करावा, या उद्देशाने निवांत पडलो. ऊन्ह बर्‍यापैकी उतरलं होतं. मी झाडाकडे पाहत होतो. इतक्यात एका हालचालीची चाहूल लागली. माझी नजर थबकली. तितक्यात एक वेगळाच आवाज कानावर पडला. मी जागेवरच शांत राहून कानोसा घेतला. एका झाडाच्या शेंड्यावर मोठ्‌ठ्या खारुताईसारखी आकृती दिसली. मी लगेच कॅमेरा काढला. माझा आनंद शब्दात वर्णन न करण्यासारखा आहे. मी नजरेची पापणी लवायच्या आतच या फांदीवरून त्या फांदीवर टुणकन उड्या मारत शेकरू गायब झालं. मी आणखी काही वेळ प्रतीक्षा कराताना माझा डोळा लागला. अचानक माझ्या तोंडावर काहीतरी पडलं. पाहतो तर काय अर्धवट खालेल्या उंबराणे माझी झोप उडविली. माझी नजर आपसूकच झाडावर गेली. स्वारी मस्त उंबराची लालंबुंद आणि गोड फळे खाण्यात मग्न होती. मी मग छायाचित्र काढायचा कंजूसपणा न करता पाहता पाहता 154 चित्र काढले. शेकरू पाहण्यासाठी तरसलेल्या माझ्या डोळ्यांना आत्ता कुठे दिलासा मिळाला होता.
 
प्रत्येक राज्यांनी आपाआपली मानचिन्हे घोषित केली आहे. सह्यांद्री पर्वतरांगेत वसलेल्या भीमाशंकर अभयारण्यात महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले शेकरू राहते. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी असून शेकरू ही एक खारीची प्रजाती आहे. शेकरूचे वजन अंदाजे दोन ते अडीच किलो असते. लांबी अंदाजे तीन फुट असून शरीरावर केस असून याची तपकीर रंगाची झुपकेदार शेपटी आकर्षक आहे. आय.यु.सी.एन. च्या लाल यादीत हा प्राणी संकटग्रस्त असून हा फक्त भारतात आढळतो. भारतात आढळणार्‍या खारीच्या एकूण 7 प्रजातीपैकी ही रटूफा इंडिका प्रजाती आहे. झपाट्याने कमी होणार्‍या या प्राण्याची मादी वर्षातून एकदाच डिसेंबर ते जानेवारी दरम्यान पिलांना जन्म देते. एक शेकरू प्राणी सहा ते आठ घरटे तयार करतो. मात्र यातील एकच घरट्यात पिलांना जन्म देतो. हा एक झाडावरून दुसर्‍या झाडावर झेप घेताना किमान 15 ते 20 फुटाची उडी मारू शकतो. मोठे परभक्षी पोहोचू नये म्हणून हे मुद्दाम आपली घरटी लहान फांद्यावर बांधतो. झाडाची फळे व फुले याचे मुख्य खाद्य आहे. शेकरूचा अधिवास, त्याला लागणारे खाद्य पुरविणार्‍या वनस्पती व भीमाशंकर अभयारण्याची जैवविविधता याबाबत शास्त्रज्ञ रेन बोर्जेस यांचा अहवाल आजही उपयोगाचा आहे. भीमाशंकरच्या लेकरू असलेल्या शेकरूच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करणे गरजचे आहे. वन विभागाचे त्या दिशेने होत असलेले प्रयत्न फलदायी ठरेल, अशी आशा करूया.
 
यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक, दिशा फाउंडेशन, अमरावती.
9730900500