डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर फरार

    दिनांक :26-May-2019
मुंबई,
मुंबईच्या प्रसिद्ध नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर फरार झाल्याचे वृत्त आहे. डॉ. तडवी यांच्या आत्महत्येनंतर महिला डॉक्टरांविरुद्ध अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर आरोपी डॉक्टर फरार झाल्या असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत.
 
 

 
 
 
 
 
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या पायल तडवी या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी पायलचा मृतदेह जळगावमध्ये आणण्यात आला. त्यावेळी संतप्त नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
 
पायलच्या आई आबिदा या जळगावहून मुंबईत नायर रुग्णालयात आल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, 'मी जेव्हा रुग्णालयात आले त्यावेळी तीन डॉक्टर महिलांनी पायलला भेटू दिले नाही. बुधवारी तिने मला फोन केला आणि रडायला लागली. तीन वरिष्ठ डॉक्टरांकडून माझा मानसिक छळ होत आहे असे ती सांगत होती.'