हिंदुत्वसाधकांच्या तपाचे फळ!

    दिनांक :26-May-2019
• - तरुण विजय
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने मिळविलेल्या जबरदस्त आणि अभूतपूर्व विजयामुळे केवळ भारतच नव्हे, तर जगाच्या राजकारणात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. अन्य देशांमध्ये असे मूलभूत परिवर्तन आणण्यासाठी शेकडो वर्षे लागली आणि त्यासाठी रक्तरंजित क्रांतीही अनिवार्य ठरली. मात्र, भारताच्या हिंदू सांस्कृतिक प्रवाहाने बोटावर गंध लावून राष्ट्रपरिवर्तनाला प्रारंभ केला आहे. विकासकार्यांमुळेच सत्ता प्राप्त झाली, हे या निवडणुकीतील निकालांवरून दिसून येत आहेच. पण, यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात हिंदूंचा, हिंदुत्वाचा अपमान करण्याचा एककलमी राजकीय कार्यक्रम राबविण्याच्या तसेच सेक्युलॅरिझमच्या नावाखाली हिंदूंना झोडपण्याच्या युगाचा अंत झाला आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, या निवडणुकीत माकप आणि भाकपचा संपूर्ण सफाया झाला. हे पक्ष कुठे साधे चर्चेतही नव्हते. जणू असे वाटते की, माकप व भाकप कधी भारतात अस्तित्वातच नव्हते. अभिनंदन!

या अभूतपूर्व यशाचे श्रेय निश्चितपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे संघटनात्मक कौशल्य आणि एकाग्रचित्त धारदार नेतृत्वाला जाते, ज्यांनी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट साध्य करून दाखविली; एवढेच नव्हे, तर सेक्युलॅरिस्ट माफियांच्या अंधारयुगाचा अंत घडवून आणला. हे सेक्युलॅरिस्ट सातत्याने हिंदूंचा, हिंदुत्वाचा अवमान करीत होते. हिंदूंचा अपमान, त्यांच्या श्रद्धास्थानांवर आघात, हाच त्यांच्या राजकीय कार्यक्रमाचा केंद्रिंबदू होता. हे निवडणूक निकाल सभ्यतापूर्ण आहेत तसेच परकीयांची वैचारिक, मानसिक गुलामगिरी झुगारून देऊन राष्ट्रगौरव, स्वदेशाचा अभिमान बाळगण्याची मानसिकता वृिंद्धगत करण्यासही या निवडणूक निकालांमुळे मदत होणार आहे. हे सरकार कार्यक्षम राहील. आधीपेक्षाही उत्तमपणे काम करेल, यात संशय नाही. पण, या राजकीय परिवर्तनामुळे जे सामाजिक परिवर्तन आपणहून घडून येईल त्याचे दूरगामी परिणाम होतील, जे सरकारी कामकाजाच्या पल्याड राहतील, या परिणामांवर सरकारी कामकाजाचा कुठलाही परिणाम होणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांसमोर केलेले भाषण एक विनम्र, उदार आणि सर्वस्पर्शी नेत्याचे राष्ट्रीय उद्बोधन होते; जे कटुता, द्वेष आणि राजकीय अस्पृश्यतेपासून प्रचंड दूर, एका विशाल दृष्टिकोनाच्या भारतीय नेत्याचे उद्गार होते. हे भाषण त्या हिंदू मनाची तडफड, वेदना आणि स्वप्नांचा समुच्चय होता ज्याच्या आत युगांपासून या देशात हिंदूंवर होणारे प्रहार, आक्रमणे आणि अपमानाच्या स्मृती होत्या. आणि ही देखील स्मृती होती की, 1947 मधील देशाच्या फाळणीनंतर स्वातंत्र्याच्या 70 वर्षांत सेक्युलॅरिझमच्या, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखालीहिंदूंचा कसा द्वेष करण्यात आला, हिंदूंच्या श्रद्धा-आस्थांवर कसे घाव घालण्यात आले. हा अपमान, मानखंडना हिंदू कधीच विसरले नाहीत. हिंदू असण्याचा अभिमान बाळगणे, हा जणू सेक्युलॅरिस्टांच्या दृष्टीने गुन्हा होता. राष्ट्रवाद, देशभक्तीसाठी जगणार्‍या कार्यकर्त्यांना लोकशाहीची मशाल प्रज्वलित ठेवण्यासाठी काश्मीर ते केरळ आणि केरळ ते बंगालपर्यंत बलिदान द्यावे लागले. वर्तमान युगात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीने प्रेरित शेकडो कार्यकर्त्यांनी ऐन तारुण्यात स्वधर्म, संविधान आणि तिरंग्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. कम्युनिस्ट व सेक्युलॅरिस्टांनी अतिशय क्रूरपणे शेकडो स्वयंसेवकांची हत्या केली. डाव्यांप्रमाणेच कट्‌टर धर्मांध व जिहादी शक्तींनीही स्वयंसेवकांना लक्ष्य केले. आजच्या या विजयप्रसंगी या स्वयंसेवकांना शत शत नमन!
कॉंग्रेस, कम्युनिस्ट आणि तमाम फुटकळ सेक्युलर पक्ष केवळ तिरस्कार, द्वेष, शिवीगाळ, असभ्यता यांच्या आधारे मोदी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना विरोध करीत होते. इतक्या खालच्या पातळीवरचे शब्द वापरण्यात आले की, त्यांचा उल्लेखही करणे शक्य नाही. नरेंद्र मोदींवर व्यक्तिगत चिखलफेक करण्यात आली. अतिशय हीन व असभ्य भाषा त्यांच्या संदर्भात वापरण्यात आली. एकट्या बंगालमध्ये 68 कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. दुर्गापूजा-विसर्जनावर बंदी घालण्यात आली. मात्र, मोहरमसाठी विशेष सुट्‌टी घोषित करण्यात आली. केरळमध्ये हिंदूंचे आस्थास्थान शबरीमलैचा अवमान करण्यात आला, शबरीमलैच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धांवर आघात करण्यात आले. शेकडो संघ स्वयंसेवक आणि भाजपा कार्यकर्त्यांचे अतिशय क्रूरपणे हत्यासत्र घडविण्यात आले.
अनेक दशकांपासून सत्तारूढ असल्याने सेक्युलर माफियांची ही टोळी अहंकाराने माजून गेली होती, आपल्याच गुर्मीत होती. वर्तमानपत्रांना हाताशी धरून, खोट्या, बेफाम आणि बेछूट आरोपांचा भडिमार करून, निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च करून आपण जनतेला मूर्ख बनवून सत्ता प्राप्त करू शकतो, असे या सेक्युलर माफियांना वाटत होते. मात्र, संघाची कार्यक्षम यंत्रणा, कमालीची शिस्त आणि एकाग्रचित्ताने लक्ष्यप्राप्तीसाठी झटणार्‍या भाजपा नेतृत्वाने राष्ट्रीय संघटनेपासून सर्वात निम्नस्तरावरील पेज प्रमुखापर्यंत अशी जबरदस्त व कार्यक्षम यंत्रणा उभी केली होती की, ज्यात चूक होण्याची कुठलीच शक्यता नव्हती. पंतप्रधान मोदींनी कालच्या आपल्या उद्बोधनपर भाषणात या ‘पन्ना प्रमुखांचा’ विशेषकरून उल्लेख केला होता.
कोण आहेत हे कार्यकर्ते?
हे ते कार्यकर्ते आहेत, जे पिढ्यान्‌पिढ्या अतिशय जिद्द व सातत्याने आणि कुठलाही गाजावाजा न करता निष्ठापूर्वक विचारधारेसाठी कार्य करीत आले आहेत. यांना पद वा प्रतिष्ठेची कुठलीही लालसा नाही. उलट या भारताचे चित्र बदलले पाहिजे, राष्ट्रपरिवर्तन झाले पाहिजे, या ध्येयाने ते कार्यरत आहेत. ते हे लोक आहेत, जे निम्न मध्यमवर्गीय श्रेणीचे नागरिक, जे स्वत: किंवा ज्यांची मुले, मुली, भाऊ देशातील विविध भागात भारतभक्ती आणि राष्ट्रीय एकतेची भावना जागविण्यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे काम करीत आले आहेत. यात असेही लोक प्रचंड संख्येत आहेत की, ज्यांच्यासाठी ‘भारत उदय’ किंवा हिंदुस्थानचे पुनरुत्थान हेच दोन शब्द महत्त्वाचे आहेत. नव्हे, हीच त्यांची विचारसरणी आहे. असा भारत की जेथे गरिबी नसेल, शेतकर्‍यांना कृषिकर्मातून पैसा आणि प्रतिष्ठा मिळेल, अत्याधुनिक हॉस्पिटल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे व सुंदर रस्ते असतील. भारतीयत्व,हिंदू धर्मावर आघात होणार नाहीत, शाळा, महाविद्यालयातून खरा इतिहास आणि पूर्वजांच्या यशोगाथा शिकविल्या जातील, वैचारिक भेदभाव राहणार नाही. मोदींनी हे सर्व करण्याविषयी भारतीयांना आश्वस्त केले आहे. बालाकोटमध्ये पाकिस्तानात घुसून त्यांचे दहशतवादी तळ नष्ट केले, दुराग्रही व अहंकारी चीनला मसूद अजहरबाबत भारताच्या बाजूने भूमिका घ्यायला भाग पाडले, इस्रायलशी प्राचीन काळापासून असलेले हिंदू-यहुदी संंबंध पुनर्जीवित केले, अमेरिकेला भारताशी बरोबरीच्या नात्याने बोलण्याची पद्धत शिकविली. जर एवढे सगळे मोदींनी घडवून आणले असेल, तर मग लोक त्यांना व भाजपाला भरभरून मते का म्हणून देणार नाहीत? नरेंद्र मोदींनी कोट्यवधी भारतीयांची मने जिंकून घेतली आहेत आणि आपण भारताचे चित्र बदलू शकतो, असा विश्वास त्यांना दिला आहे. आपण स्वत: फकिराप्रमाणे राहू, पण लोकांना समृद्ध करण्याचे स्वप्न साकार करू, असे त्यांनी आश्वस्त केले आहे.
मात्र, हे ध्यानात ठेवले पाहिजे की, विजयाचा मुकुट त्या अनाम, असंख्य कार्यकर्त्यांचे रक्त, घाम व बलिदानाने रंगला आहे आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यापासून ते सामान्य कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हा उत्तुंग विजय मिळाला आहे. अखेर अरुणाचलपासून ते कन्याकुमारी आणि गुजरात ते लडाखपर्यंत राष्ट्रीय महामार्ग तथा जलमार्गांचे जे प्रचंड जाळे विणले, गावागावात वीज आणि सौरऊर्जा, गरीब महिलांना उज्ज्वला गॅस, मुलींना सुरक्षा आणि चांगल्या शाळा, जीएसटीच्या माध्यमातून करचोरीला आळा, इन्सॉॅलव्हन्सी अॅक्ट-दिवाळखोरीत जाणार्‍या कंपन्यातील गैरव्यवहाराला आळा घालणारा कायदा, भ्रष्टाचारावर अंकुश आणि परराष्ट्रविषयक मुद्यांवर मिळालेले अभूतपूर्व यश, ही मोदी सरकारची प्रमुख उपलब्धी आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच सफल विदेश धोरणाचा निवडणुकीवर परिणाम अनुभवास आला. हे सर्व टीमवर्क होते. मंत्रिमंडळातील काही ख्यातनाम व्यक्तींनी आपल्या प्रचंड कार्यक्षमतेमुळे भाजपा सरकारला मोठे यश मिळवून दिले आणि मोदी आहेत तर सर्वच शक्य आहे, हा विश्वास देशवासीयांना दिला. राहुल गांधी यांचा अमेठीतील पराजय विजयाच्या मोदकावर देवीच्या टिळ्याप्रमाणे शुभच मानला पाहिजे. स्मृती इराणी यांनी गेल्या पाच वर्षांपासून अमेठीला विशेष मतदारसंघ या नात्याने जपले, तेथील जनतेची कामे केली. वास्तविक पाहता अमेठीचे खासदार होते राहुल गांधी, मात्र स्मृती इराणी यांनी खासदार नसतानाही राहुलपेक्षा अधिक कामे केली, स्मृतीचे परिश्रम कारणी लागले आणि राहुल गांधी यांना सुदूर वायनाडला पळून जावे लागले.हिंदुद्वेषात आकंठ बुडालेल्या दिग्विजयिंसह यांना साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी चांगलाच धडा शिकविला आणि संतप्तहिंदूंच्या वेदना शांत केल्या. यासाठी भाजपा नेतृत्वाचे फार फार आभार!
चंद्राबाबू नायडूसारख्या फाटक्या तोंडाच्या, भ्रष्टाचारी आणि अहंकारी नेत्याला आंध्रच्या जनतेने चांगलाच धडा शिकविला. काश्मीर ते सुदूर दक्षिणेपर्यंत कॉंग्रेस आणि त्यांच्या घराणेशाहीचा पराभव ही ऐतिसासिक घडामोड आहे. उत्तरप्रदेशातील विजय म्हणजे या मुकुटावरील जणू मोरपंखच आहे! मायावती आणि अखिलेशचेहिंदूंमध्ये फूट पाडणारे राजकारण तेथील सुज्ञ मतदारांनी नेस्तनाबूत करून टाकले आणि कट्‌टरहिंदुद्वेषी मुस्लिम समर्थक राजकारण चकनाचूर झाले. या संपूर्ण घटनाक्रमात अमित शाह यांचे संघटनात्मक कौशल्य सार्‍यांनी पाहिले. आधुनिक भारतातील चाणक्याचे दर्शन त्यांच्या स्वरूपात घडले आणि एक यशस्वी रणनीतिकार म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. या सर्वांमुळे भारत राष्ट्राच्या नवीन विकासगाथेची ही यात्रा अश्वमेध यज्ञाच्या अश्वांप्रमाणे विजय पथावर यशस्वीपणे मार्गक्रमण करीत राहील, यात संशय नाही!