बंधुभावाची जगन्नाथपुरी...

    दिनांक :26-May-2019
भारताच्या पूर्व किनार्‍यावर या विश्वाचा सारा पसारा धारण करणारा जगजेठी जगन्नाथ समुद्राकडे एकटक बघत उभा आहे. ही नगरी दाक्षिणात्य वैष्णव परंपरेत 108 दिव्यदेशम्‌ स्थळांपैकी एक म्हणून भक्तप्रिय आहे. कारण या ठिकाणी सगळ्या 12 अळवारांची (दाक्षिणात्य वैष्णव संत) प्रतिभा जगन्नाथाच्या दर्शनानं जागृत झाली. त्या सर्व विष्णुभक्तांनी या मंदिरात आपापलं भक्तिकाव्य प्रस्तुत केलं. 12 व्या शतकात होऊन गेलेले आणि भारतीय भक्तिआंदोलनाला मधुराभक्तीचं वळण देणारे संस्कृत कवी जयदेवाचं स्फूर्तिस्थानही हेच आहे. याच जगन्नाथपुरीत त्यांनी कृष्णाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या राधा आणि अन्य गोपिकांच्या प्रेमाचं वर्णन करणारं गीत गोिंवद हे अजरामर काव्य रचलं.
 
याच मंदिराच्या प्रांगणात कृष्णभक्तीत लीन असलेल्या श्रीचैतन्य महाप्रभूंचे (1486- 1534) अष्टभाव दाटून यायचे. भगवद्भक्तीच्या त्या उन्मनी अवस्थेत त्यांनी शिक्षाष्टकम्‌ स्तोत्र रचलं. त्यात ते म्हणतात-
नयनं गलदश्रुधारया वदनं गदगदरुद्धया गिरा।
पुलकैर्निचितं वपुः कदा तव नाम-ग्रहणे भविष्यति।।6।।
 
(हे प्रभू, कधी तुमचे नाव घेताना माझ्या नयनाश्रूंनी माझे मुख भिजून जाईल? कधी माझी वाणी अतिहर्षामुळे गदगद होऊन अवरुद्ध होईल आणि कधी माझं शरीर पुलकित/रोमांचित होईल?)
 

 
 
 
ज्या जगन्नाथाच्या प्रेमभक्तीत संतांची ही मांदियाळी नादावली, त्याच्याविषयी थोडाफार फरक असणार्‍या काही कथा प्रचलित आहेत. त्यापैकी सर्वात जास्त सांगितली आणि ऐकली जाणारी कथा येते सरलदासानं ओडिया भाषेत लिहिलेल्या महाभारतात. गुजरातेत प्रभासपाटण या स्थानी झाडाच्या सावलीत बुंध्याला टेकून, डाव्या पायाच्या गुडघ्यावर उजव्या पायाचं पाऊल ठेऊन पहुडलेल्या श्रीकृष्णाचा पाय दूरून हरणाच्या तोंडासारखा दिसत होता. जरा नावाच्या शिकार्‍यानं टोकाला विष लावलेल्या बाणानं त्या पायाचा वेध घेतला. शारीरिकदृष्ट्या थकलेल्या क्लांत श्रीकृष्णानं सरस्वती-कपिल- हिरण्य या तीन नद्यांच्या संगमापर्यंतचं अंतर अतिशय कष्टानं लंगडत लंगडत पार केलं आणि तिथे असलेल्या एका गुहेत त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. त्यांच्या पार्थिवाला अर्जुनानं अग्नी दिला. असं म्हणतात की, श्रीकृष्णाचं शरीर काही केल्या भस्म होईना तेव्हा अर्जुनानं ते पश्चिम किनारी समुद्रास अर्पण केलं. काही काळपर्यंत एखाद्या ओणक्याच्या रूपात (दारु) ते समुद्राच्या लाटांवर तरंगत होतं आणि वाहत वाहत पूर्व किनार्‍याला येऊन स्थिरावलं.
 
त्या वेळी विष्णुभक्त असलेल्या इंद्रद्युम्न राजाला शाबर जनजातीचं आराध्यदैवत नीलमाधवला आपल्या राजधानीत आणून स्थापन करायचं होतं. तो आपल्या सगळ्या राजदंभ आणि अहंकारासह आपली सारी सेना घेऊन तिथे गेलाही, पण नीलमाधवाची मूर्ती तिथून अदृश्य झाली. त्याची विष्णुभक्ती मात्र नि:संशय होती म्हणून त्याला दृष्टांत झाला की, रोहिणी कुंडात एक अत्यंत पवित्र असं दारुब्रह्म म्हणजे ओणका आहे. त्याच्या देवता मूर्ती तयार करण्यात याव्यात.
 
त्यानुसार सुताराचं रूप घेऊन आलेल्या विश्वकर्माच्या मदतीनं त्या दारुपासून देवतामूर्ती तयार करण्यात आल्या. पण, या मूर्ती तयार करताना सुतारानं राजाला एक अट घातली होती की, तो सुतार एका मोठ्या बंद दालनात एक महिन्यात त्या ओंडक्यापासून मूर्ती तयार करेल. पण, त्या काळात कोणीही ते बंद दार उघडू नये, िंकवा त्या दालनात डोकावू नये. राजानं त्याची अट मान्य केली. पण, पंधरा दिवसानंतर त्या दालनातून काहीच आवाज येत नव्हता म्हणून राजाचा संयम सुटला. अधीर होत त्यानं दालनाचं दार उघडलं. आत तो सुतार नव्हता, पण चेहरे धड असलेल्या तीन मूर्ती मात्र होत्या. त्यांना हात पाय नव्हते. राजाला आकाशवाणी ऐकू आली, ‘‘आधी तुझ्याकडे राजसत्तेचा दंभ आणि अहंकार होता म्हणून मी अंतर्धान पावलो. आता तुला संयम नाही त्यामुळे या मूर्ती अशाच हातपाय नसलेल्या राहिल्या. आता यांचीच स्थापना कर.’’ इंद्रद्युम्न राजानं ती आज्ञा पाळली. तोच हा जगन्नाथ, त्याची भावंडं बलभद्र आणि सुभद्रा!
 
तर एक जनश्रुती असंही सांगते की, वासुदेव कृष्णाचं सारं पार्थिव भस्म झालं, पण त्याचं हृदय मात्र अदग्धच राहिलं. ते नंतर पश्चिम समुद्रात सोडण्यात आलं आणि ओंडक्याच्या रूपात ते पूर्व किनार्‍याला लागलं आणि इंद्रद्युम्न राजाला त्या ओंडक्याच्या मूर्ती तयार करण्याचा आदेश देणारं स्वप्न पडलं.
 
हे जगातलं एकमेवाद्वितीय असं मंदिर आहे, ज्यात दोन भावांच्या मध्ये बहीण उभी आहे. यापैकी सुभद्रा आणि बलभद्र, वसुदेव आणि रोहिणीची अपत्य आहेत, तर श्रीकृष्ण वसुदेव-देवकीनंदन. एकदा म्हणे श्रीकृष्णाच्या अष्टपत्नी यशोदेकडे जाऊन म्हणाल्या की, आम्हाला श्रीकृष्णाच्या बाललीला ऐकायच्या आहेत. यशोदा म्हणाली, ‘‘मी सांगायला लागेन आणि तितक्यात बलरामकृष्ण दोघेही इथे येऊन पोहचतील. मग मला सांगता येणार नाही.’’ त्यावर तोडगा म्हणून सुभद्रेला दारावर लक्ष ठेवायची आणि त्या दोन्ही भावांना यशोदेच्या कक्षात येऊ न देण्याची जबाबदारी देण्यात आली.
 
यशोदेनं श्रीकृष्णाच्या बाललीलांचं वर्णन सुरू केलंच होतं, बलरामकृष्ण दोघेही तिथे आलेच. सुभद्रा दाराच्या मधोमध दोन्ही हात चौकटीवर ठेवून उभी राहिली आणि तिच्या एका बाजूला श्रीकृष्ण दुसर्‍या बाजूला बलराम होते. ते दृश्य इतकं मनमोहक होतं की, सगळे देव त्यांच्यावर पुष्पवृष्टी करू लागले. त्यानंतर श्रीकृष्णानं कलियुगातही मी आणि माझे हे बहीण-भाऊ सदेह इथे राहू म्हणून आशीर्वाद दिला. तेव्हापासून दोन सख्खी आणि एक सावत्र भावंडांचं हे त्रिकूट या जगन्नाथपुरीत विराजमान आहेत.
 
भारतीय कालगणनेनुसार ज्या वर्षी आषाढ महिना अधिक असतो त्या वर्षी जगन्नाथ सुभद्रा आणि बलभद्रच्या काष्ठ मूर्ती नव्यानं स्थापन करण्यात येतात. विशिष्ट चिन्हं असलेल्या काळसर कडुिंनबाच्या झाडापासून केष्टो म्हणजे श्रीकृष्ण आणि पिवळसर कडुिंनबापासून बलराम आणि सुभद्रेच्या मूर्ती तयार करून त्यात जुन्या मूर्तींतला ब्रह्मपदार्थ विधीपूर्वक ठेवण्यात येतो. हा ब्रह्मपदार्थ म्हणजे नेमकं काय, हे कुणालाच माहीत नाही. कारण हा विधी, विधी करणार्‍या व्यक्तीचे डोळे आणि हात फडक्यानं बांधून रात्रीच्या अंधारात करण्यात येतो. पण, सर्वसामान्य भक्ताच्या मनात श्रद्धा आहे की, इंद्र्‌द्युम्नराजाला सापडलेलं श्रीकृष्णाचं हृदयच हा ब्रह्मपदार्थ आहे. या संपूर्ण विधीला ‘नवकलेवरविधी’ असं नाव आहे.
 
सामान्य माणसासारखी दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमा ते आषाढ शुद्ध प्रतिपदा या काळात जगन्नाथ त्रयी आजारीही पडते. हे झालं दृश्य कारण. यामागचं मुख्य कारण म्हणजे या पंधरा दिवसांत त्यांचा वार्षिक रखरखाव करण्यात येतो. दुसर्‍या दिवशी म्हणजे आषाढ शुद्ध द्वितीयेला तीन स्वतंत्र रथात बसून ती तिघं मंदिरातून बाहेर येतात आणि आपल्या मावशीच्या घरी जातात. नऊ दिवस देव मंदिरात नसतात. त्यांचं वास्तव्य मावशीच्या घरी गुंदेचा मंदिरात असतं. याच काळात ते भक्तांना भेटतात.
 
मंदिराचा इतिहास किमान दोन हजार वर्षांचा आहे. आदिशंकराचार्यांनी इथल्या मंदिराच्या गर्भगृहातल्या दैनंदिन नित्य अंगभोग-रंगभोगाचे, नित्योपासनेचे जे जे विधी निश्चित केले होते ते ते आजतागायत कोणत्याही बदलाशिवाय तंतोतंत पाळण्यात येतात. परामाचार्यांनी पूर्व दिशेचा मठदेखील इथेच स्थापन केला.
 
गर्भगृहाच्या बाहेरचे विधी मात्र कालपरत्वे होऊन गेलेल्या विविध वैष्णव संताच्या प्रेरणेनं त्यांनी आखून दिल्या विधींप्रमाणे केले जातात. यातल्या प्रमुख संतमंडळीत रामानुजाचार्य, श्रीरामानंदाचार्य, मध्वाचार्य, निम्बार्काचार्य, चैतन्य महाप्रभू आहेत.
 
तरी सध्या जे मंदिर अस्तित्वात आहे त्याचा इतिहास गंग वंशाच्या ताम्रपत्रातून आपल्याला कळतो. किंलगराजा अनंतवर्मन चोडगंग देव (1078-1148) च्या कारकीर्दीत या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं बांधकाम सुरू झालं. या मंदिराचा मुख्य मंडप ज्याला जगमोहन म्हणतात आणि किंलग शैलीचं शिखर म्हणजे विमान (ज्याला उडिया भाषेत देऊळ असाच शब्द आहे) या काळात पूर्ण झालं. त्यानंतर इ. स.1197 मध्ये किंलगराज अनंग भीम देव प्रथम आणि अनंग भीम देव द्वितीयच्या काळात मंदिराचं जे रूप आज दिसतं ते प्राप्त झालं. या मंदिराविषयी आणि त्याच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी पुढच्या लेखांकात जाणून घेऊ या.
••