मध्यपूर्वेत अमेरिकन सैन्यात वाढ

    दिनांक :26-May-2019
तभा ऑनलाईन टीम
वॉशिंग्टन,
इराणकडून वाढता धोका लक्षात घेऊन मध्यपूर्वेमध्ये आणखी लष्करी कुमक तैनात करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. मध्यपूर्वेतील आंतरराष्ट्रीय शांतता कायम राखण्यासाठी १,५०० सैनिक तैनात करण्यात येणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर इराणकडून जोरदार टीका झाली आहे.
 
 
अमेरिकेचे हे पाऊल म्हणजे अंतरराष्ट्रीय शांततेला धोका असून त्याला विरोध करणे गरजेचे बनल्याचे इराणचे विदेश मंत्री मोहम्मद झावेद झरीफ यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढल्यामुळे अमेरिकेने मे महिन्यामध्ये आखाती सागरी प्रदेशात लढाऊ नौका आणि विमानवाहू नौका तैनात केल्या होत्या. इराणकडून अमेरिकेच्या मालमत्तांवर हल्ले केले जाण्याची शक्‍यता लक्षात घेऊन अमेरिकेने इराकमधील दूतावासही अंशतः बंद केला आहे.