पॅरासेलिंग करणे जीवावर बेतले

    दिनांक :26-May-2019
मुरुड : समुद्र किनारी पॅरासेलिंगचा थरार अनुभवणे याची मजा काही औरच असते. पण मुरुड येथे हा थरार अनुभवणे दोघांना महागात पडले आहे. पॅरासेलिंग करताना दोर तुटून ५० फुटांवरून कोसळल्यानं १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रायगड जिल्ह्यातील मुरूड समुद्रकिनाऱ्यावर घडली. वेदांत पवार असे मृत मुलाचे नाव आहे. तर या घटनेत त्याचे वडील गणेश पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील कसबा रोड येथे राहणारे गणेश पवार हे मुलगा वेदांत आणि कुटुंबासह काल, शनिवारी सकाळी मुरूड समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. गणेश आणि वेदांत हे दोघे पॅरासेलिंगचा थरार अनुभवत होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास पॅरासेलिंग उंचावर झेपावले. मात्र, काही वेळात पॅरासेलिंगचा दोर तुटला. दोघेही जवळपास ५० फुटांवरून किनाऱ्यावर कोसळले. यात वेदांतचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर त्याचे वडील गणेश हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मुरूड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पॅरासेलिंग चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याच्याकडे परवाना आहे की नाही, याची चौकशी पोलीस करत आहेत.