बंदुकीच्या धाकावर माथेफिरूने भोजपुरी अभिनेत्रीला बनवले बंदी!

    दिनांक :26-May-2019
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे ‘अभागिन बिटिया’ या भोजपुरी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. या घटनेने ‘अभागिन बिटिया’च्या सेटवर खळबळ माजली. होय, येथील एका हॉटेलात भोजपुरी चित्रपटाची युनिट थांबलेली होती. याचदरम्यान एका माथेफिरू युवकाने चित्रपटाची हिरोईन ऋतू सिंग हिला बंदुकीच्या धाकावर बंदी बनवत गोळीबार सुुरू केला. या गोळीबारात एक स्थानिक युवक गंभीर जखमी झाला.
 
 

 
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी या माथेफिरू युवकाला समजवण्याचे प्रयत्न केलेत. पण त्याने पोलिस अधिक्षकांवरही गोळीबार केला. या हल्ल्यातून पोलिस अधिक्षक थोडक्यात बचावले. यानंतर पोलिसांनी ऐनकेन प्रकारे गोळीबार करणाºया व अभिनेत्रीला वेठीस धरणाºया युवकास अटक केली. अटक केलेल्या या आरोपीचे नाव पंकज यादव आहे.
फिल्म युनिटचे सदस्य अवधेश राय यांनी सांगितले की, हॉटेलात एक बाहेरचा एक तरूण आम्हाला दिसला. तो आमच्या युनिटमधला नव्हता. पण तो कुणाला तरी भेटायला आला असावा, असे आम्हाला वाटले. आम्ही सगळे न्याहारी करण्यास बाहेर पडलो आणि तो ऋतुच्या रूममध्ये शिरला. त्याने लगेच हवेत गोळीबार सुरु केला. मला ऋतुसोबत लग्न करायचेय, अशी त्याची मागणी होती.