मूकस्तंभ

    दिनांक :26-May-2019
तसा त्यांचा आमच्याकडे येण्याचा रोजचा नित्यक्रमच असायचा. ते साधारण सकाळी आठ वाजता यायचे. एक-दीड तास आरामात बसायचे, वर्तमानपत्र वाचायचे. आमचा मोठा वाडा होता. समोरच मोठा व्हरांडा आणि व्हरांड्यासमोर विस्तीर्ण अंगण होते. अंगणाच्या एका बाजूला गाई, बैल, म्हैस त्यांचे पाडस यांनी भरलेला मोठा गोठा होता. व्हरांड्यात काही फर्निचर होते आणि हॉलमध्ये मात्र मुख्य बैठक होती. ते मात्र व्हरांड्यातच बसायचे. त्यांना तेथे मोकळा वारा लागत असावा किंवा मोकळे वाटत असावे. ते मधूनच आकाशाकडे बघायचे. तर कधी गोठ्यात, तर कधी कधी इकडे तिकडे! मुख्य गोष्ट म्हणजे- एक दीड तासात केवळ चार-पाच वाक्य माझ्या वडिलांशी बोलायचे. माझ्या वडिलांची सकाळची वेळ कामची असायची. गाई-म्हशीला ते चारा देत. कधी दूधही काढत. गुरांना पाणी देत. आणि मग शेवटी अर्धा तास माझे वडील त्यांच्यापाशी बसत. असे हे गृहस्थ आमच्या दादांचे म्हणजे माझ्या वडिलांचे मित्र होते- बाबूराव काका! पुन्हा दुपारी ते चार वाजता येत. त्यावेळीही एक तास बसत. आम्हा बहिणींना त्यांच्या येण्यावर कधीच आक्षेप नव्हता. एकदा बाबूराव काका माझ्या वडिलांना सांगत होते-‘‘अरे दादा, याआधी मी आपला मित्र प्रभाकरकडे जायचो. आठ दिवसांनंतर त्यांची मुलगी माझ्या अंगावर ओरडली, हे काय रोज सकाळी येता आणि आमचा पेपर बसता वाचत, त्यामुळे आम्हाला पेपर वाचायला मिळत नाही सकाळी! तेव्हापासून मी तिथे जाणं सोडलं रे! आणि तुझ्याकडे येतो. महिने झाले, मात्र कधीच कुणी बोललं नाही. तुझ्या मुली खरंच गुणी आहेत.’’ खरं म्हणजे आम्हालाही बाबूराव काकांची सवय होऊन गेली होती. उलट एखाद्या दिवशी ते आले नाही किंवा उशिरा आले तर आम्हाला चुटपुट लागायची. असंच चालू होतं कित्येक महिने!
 
 
 
एकदा काय वाटलं कुणास ठाऊक, मी आईला बोलून गेले की- ‘‘हे काका, रोज आपल्याकडे नेमाने येतात. दोनचार वाक्यांच्या वर बोलत नाही. मौन धरून बसले असतात. जणू मूकस्तंभ! नोकरी कामधंदा नाही त्यांना! तब्बल चार मुले आहेत! मग सगळं कशाच्या भरोशावर गं? आणि हे असे का वागतात?’’ आई उदासपणे म्हणाली- ‘‘नियती नावाचे चक्र माणसाला गरगर फिरवून कुठे फेकून देईल, याचा नेमच नसतो गं! कधी वैभवाच्या कीर्तीच्या शिखरावर तर कधी गटांगळ्या खात ठेवतं ते!’’ आणि मग तिने त्यांची कथाच मला सांगितली. आता तर बाबूराव काका गेले. आई गेली. दादा गेले. पण त्यांची जी धक्का देणारी कथा आजतगायत मी नाही विसरू शकली. आणि मला प्रश्न पडला की आई म्हणाली, त्याप्रमाणे काकांना नियतीने गरगर फिरवलं की माणूस नावाच्या क्रूर, धूर्त, श्वापदानं बाबूराव काकाच्या जीवनला ओरबडून टाकलं होतं? सामान्य माणसाच्या मनाला अस्वस्थ करणारी त्यांची कथा आहे. आणि त्यांचे जीवन बरबाद करणारी व्यक्ती ही कोणी साधीसुधी नव्हती. तर शिकलेली, धनाढ्य आणि अत्यंत प्रसिद्ध अशी व्यक्ती होती! वरून मुलामा मोठ्या माणसाचा तर आतून कर्तृत्व नीच माणसालाही लाजवेल असं!
 
तसं बाबूराव काकांचे जीवन अत्यंत आनंदमयी होते. काय कमी होते त्यांच्या संसारात? नावाजलेल्या बँकेत नोकरी होती. तीन मुलं होते आणि वृद्ध आई होती. छान सगळं सुरळीत चालू होतं. मात्र काकांची अचानक तब्येतीची हलकीशी कुरकुर सुरू झाली. पहिल्यांदा सर्दी झाली. काही दिवसांनी सर्दी सोबत खोकला सुरू झाला. डॉक्टरांची ट्रिटमेंट सुरू होती. पण आराम काही पडेना. त्यानंतर गावातले हकीम झाले. वैद्य झाले. काढे घेणे सुरू झाले. पण आराम काही पडत नव्हता. खोकला वाढतच होता. बँकेत सुट्‌ट्या होतच होत्या. आणि आता त्यांच्या अंगात तापही राहत असे. आणि प्रकृती बिघडू लागली आणि एके दिवशी कहरच झाला. त्यांना रक्ताची उलटी झाली. घरच्या मंडळींचे डोळे उघडले. शहरात जाऊन डॉक्टरला दाखवले. डॉक्टरांनी निदान केले काकांना क्षय म्हणजे टीबी झाला. डॉक्टरांची ट्रिटमेंट सुरू झाली. त्यावेळी म्हणजेच पन्नास वर्षांपूर्वी टीबीवर रामबाण परफेक्ट औषधे निघाली नव्हती. या रोगाने नऊ-दहा महिने खाल्ले. जवळपास दहा महिन्यांनंतर ते बँकेत रुजू व्हायला गेले. पण बँकेने मात्र त्यांना रुजू करून घेतले नाही. बरेच प्रयत्न त्यांनी करून पाहिले पण बँक घ्यायला तयार नव्हती. खरेतर नियमाप्रमाणे बँकेने त्यांना जॉईन करून घ्यायला पाहिजे होते. आणि सोबत दहा महिन्यांचा पगारही द्यायला पाहिजे होता. पण बँक काहीच करायला तयार नव्हती. त्यांना बँकेने टीओ दिला. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी सल्ला दिला की बँकेवर तू केस कर. अर्थात एवढ्या मोठ्या बँकेवर केस करायची तर वकीलही तसाच मातब्बर बघायला हवा होता. त्यांनी नागपूर गाठले आणि नामांकित विद्वान, प्रसिद्ध, वकिलाकडे आपली केस सुपूर्द केली. अर्थात वकिलाची फी पण भक्कम होती. मात्र काही एक विचार न करता साठवलेल्या पैशातील काही रक्कम त्यांनी वकील आणि कोर्ट त्याच्यासाठी खर्च करायची ठरवली. आधीच आजारपणावर साठवलेले पैसे खर्च झाले होते. सोबत हा खर्च, त्यामुळे आता पैशाची तंगी जाणवू लागली. कर्ज घेणे सुरू झाले. वकील म्हणाले- ‘‘तुम्ही केस िंजकणारच कारण बँकेला तुम्हाला नोकरीवर घ्यावेच लागेल! याशिवाय जेवढी तुम्ही मेडिकल लिव्ह काढली, त्या महिन्यांचा म्हणजे जवळपास दहा महिन्यांचा पगारही द्यावा लागेल! कारण की सरकारने टीबीला संरक्षण दिले आहे.’’ केस सुरू झाली. तारखांवर तारखा सुरू चार झाल्या. खर्च दिवसेंदिवस वाढू लागला. घर खर्च, मुलांचे शिक्षण, शेतीवरती पैसे यामुळे कर्जाचा डोंगरही वाढू लागला. पण समोर आशा दिसत होती केस िंजकणारच! बाबूराव काका त्यामुळे निश्चिंत होते. केस जिंकली तर आपल्याला पैसे मिळतील आणि पुन्हा आपली नोकरी सुरू होईल! आणि पैशाची तंगी नष्ट होईल. अशा रीतीने दिवस जात होते. काही दिवस केस चालली आणि निकालाची वेळ जवळ येऊन ठेपली. वकिलांनी सांगितलं होतेच आपली बाजू सॉलिड आहे, निश्चिन्त राहा! निकाल अवघ्या चार दिवसांवर आला होता. मात्र बाबूराव काका चार दिवस बेचैन होते. वकिलांनी दिलासा दिला होता पण मन मात्र अस्वस्थ होते.
 
बँकेचे सतत प्रयत्न सुरू होते केस िंजकण्यासाठी! आणि शेवटी बँकेला यश आलेच! बाबूराव काका आणि तीन चार मित्र मिळून जीपने नागपूरला निकालाच्या दिवशी गेले. मनात आशा होती, आपल्याच बाजूने निकाल लागणार! आणि त्यादिवशी काका केस हरले. निकाल ऐकून काकांची शुद्ध गेली. मित्रांनी त्यांना अक्षरशः उचलूनच बाहेर आणले. आणि वाहनांमध्ये घालून त्यांना गावी आणलं! घरी आल्यावर3-4 दिवस त्यांची शुद्ध गेलेली होती. नंतर ते ज्यावेळी शुद्धीवर आले, त्यावेळी त्यांची नजर मात्र शून्यातच होती. ते कोणाशी बोलत नव्हते. काका मूकस्तंभ झाले.
 
कोणताही पक्ष आपली जीत व्हावी म्हणून सदैव प्रयत्न करतोस हे खरे आहे! बँकेने काकांच्या वकिलांचे मन वळवून त्यांना पैसे देऊन काकांचे विरुद्ध पुरावे तयार केले. वकिलानी काकांना दगा दिला. पैशासाठी वकील विकले गेले. केस फिरवली. आपल्या या निर्णयामुळे एक कुटुंब उद्‌ध्वस्त होत आहे, याची त्या धनाढ्य आणि पैशासाठी लालचावलेल्या वकिलाला काही जाणीवही नव्हती. काकांजवळ आता एक पैसाही नव्हता. याउलट वकील अधिक श्रीमंत झाला होता. काकांचे सर्व पैसे खर्च झाले होते. ते कंगाल झाले होते. आजारपण आणि कोर्टकचेरी शिवाय आता तर चार मुले पदरी होते. शेतीलाही खर्च लागणारच होता. त्यांचे भान हरपले आणि मूकस्तंभासारखे ते वावरू लागले. त्यावेळी त्यांची शेती सुद्धा बघायला कुणी जात नव्हतं. मोठा मुलगा केवळ दहा वर्षांचा होता. शिकत होता. बुद्धीने अगदीच सुमार होता. थोडा मोठा झाल्यावर शेती बघू लागला. नंबर दोनचा हुशार होता पण त्याला शिकवायला पैसे नव्हते. तर नंबर तीनचा खूप आजारी पडला. त्याच्यावर नीट उपचारही होत नव्हता. कारण घरी तेवढे पैसे नव्हते. त्यामुळे त्या आजारात त्याचे डोळे गेले. डोळ्यांवर उपचारही पूर्ण होऊ शकले नाही. पुढे पैशाची अडचण असल्यामुळे काका त्याला अंध विद्यालयातही टाकू शकत नव्हते. परंतु एका नातेवाईकाने मोठे मन केले आणि त्याला अंध विद्यालयात टाकले. काकांची पत्नी शिकलेली नव्हती. त्यांना शिवणकाम वगैरे येत नव्हते. दुसर्‍याच्या घरी जाऊन काम करायचे तर तेही शक्य नव्हते. कारण की बँकेत काम करणार्‍या बाबूची बायको लोकांच्या घरी जाऊन काम करते, असं गावातील लोकांनी म्हटलं असतं. लहान गावातील लोकांच्या पचनी पडणारी ही गोष्ट नव्हती. तो काळ फार वेगळा होता! अशा गोष्टींना नाव ठेवले जात! काकांच्या संसाराचा डोलारा पार कोसळला होता. नंतर कोर्टात जायला त्यांच्या जवळ दमडीही शिल्लक नव्हती.
 
कालचक्र अव्याहत सुरू असते. हे कलियुग आहे. येथे कर्म चांगले असो वा वाईट त्याचे फळ त्याप्रमाणे मिळते हेच खरे! या न्यायानुसार ज्या वकिलांनी बाबूराव या सरळ, साध्या, गरीब माणसाचा संसार उद्‌ध्वस्त केला, त्या लालची वकिलाचाही संसार नंतर कोलमडून पडला. त्या वकिलाने त्यांच्या एकुलत्या एका अत्यंत लाडक्या मुलीचा सगळ्यांचे डोळे दिपतील अशा थाटात, अमाप पैसा खर्च करून विवाह करून दिला. पण केवळ सहा महिन्यांत तिच्या नवर्‍यानेे तिला घटस्फोट दिला. तिच्या नवर्‍याला ती आवडलीच नव्हती. त्या वकिलाच्या पत्नीचेही या धक्क्याने निधन झाले. आपल्या मुलीची अशी स्थिती, पत्नीचे निधन, शिवाय समाजात घोर अपमान, जीवनात कधीच न अनुभवलेले अपयश या सर्व गोष्टींचा वकिलाच्या मनावर गंभीर परिणाम झाला. आणि त्यांची शुद्ध गेली. ते शून्यात बघू लागले. आणि तेही मूकस्तंभ झाले!
 
• -वर्षा विजय देशपांडे
••