अंंगठा

    दिनांक :26-May-2019
रोजच्या सवयीप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल हातात घेतला. ‘व्हॉटस्‌अॅप’वर काही महत्त्वाचं आहे का बघून झोपावं, असा विचार केला. आणि लक्षात आलं अंगठा काही काम करेना. हलायला मुळी तयारच नव्हता. शेवटी त्याला म्हटलं- का रे बाबा काय झालं ? का रुसलास ंअसा? त्यावर आधी तर तो काही बोलला नाही, पण फारच मागे लागले तेव्हा कुठे त्याने तोंड उघडलं. सूर जरा तक्रारीचाच होता. अत्यंत गंभीरपणे तो माझ्याकडे बघायला लागला.आणि मग त्याच्यात आणि माझ्यात घडलेला संवाद चांगलाच रंगला
 
 
 
 
‘‘तुम्ही लोक माझा खूप गैरफायदा घेता.’’ त्याचा आरोप.
‘‘गैरफायदा? तो कसा?’’
‘‘कुणालाही वेडावून दाखवायला तुम्ही माझा वापर करता. मला ते मुळीच आवडत नाही.’’
‘‘अरे पण कुणाचं कौतुक करायचं असेल, प्रोत्साहन द्यायचं असेल तर आम्ही तुझीच मदत घेतो नं?’’
‘‘ हो. पण ते फार कमी. कारण मुळात तुम्ही माणसं दुसर्‍याचं कौतुक फार क्वचित करता. तुमचं ‘मी’ ‘मी’ जास्त चालतं. आणि त्यासाठी मला नाही तर तर्जनीला पुढे करता. शिवाय विजय मिळाला, यश मिळालं की तुम्ही माझ्या शेजारची दोन बोटे उंचावता तेही मला मान खाली घालायला लाऊन.....’’.
‘‘अरे तशी रीतच आहे, हात उंचावून यश, आनंद व्यक्त करण्याची.’’
‘‘हात नाही. फक्त तर्जनी आणि मधलं बोट. मी नसतो त्यात.’’
‘‘अच्छा म्हणून तू रागावलास तर! आता माझं ऐकशील?’’
‘‘तू काय वेगळं सांगणार?’’
‘‘ ऐक नं.....हे बघ आमच्यासाठी तुम्ही पाचही बोटे सारखीच आहात. तुमची प्रत्येकाची कामं ठरलेली आहेत. त्यात तू तर कुटुंब प्रमुख असल्यासारखा आहेस. तुझ्यावाचून आमचं किती अडतं हे मी तुला काय सांगणार? एकलव्याचा अंगठा तुझाच पूर्वज ना? चार बोटं कितीही एकत्र आली तरी मूठ बंद होत नाही. त्यासाठी तूच हवास. आणि एकदा तू त्यांना सामील झालास की तयार हेाणारी मूठ एकजूट दाखवते. शक्तीप्रदर्शन करते. हे का विसरतोस तू? आणि वेडावून दाखवण्यासाठी आम्ही तुझा उपयोग करतो हे खरंय्‌, पण तर्जनीचाही तसा वापर हातोच ना? दुसर्‍यांवर दोषारोप करायला! असं आम्ही करायला नको, पण मानवी स्वभाव काय करणार? अनामिका आपण प्रामुख्याने देवपूजेसाठी वापरतो. आणि करंगळी? अर्थात दुसर्‍याशी अबोला धरण्यासाठी शिवाय असू दे. काही पटतंय्‌ का तुला माझं म्हणणं? आणखी एक गोष्ट. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. तो चार बोटांनी धरायचा आणि अंगठ्याच्या हालचाली करून चालवायचा. संदेश पाठवण,ं आलेले फोन घेणं इत्यादी सार्‍या गोष्टी अंगठ्यानेच तर होतात. तरुण पिढी किती सफाईने अंगठ्याचा वापर करते. आणि तरीही तू रुसून बसतोस?’’ तो काहीच बोलला नाही.
‘‘असू दे आणखी एक गोष्ट सांगते तुला. पूर्वी म्हणजे दीडशे, दोनशे वर्षांपूर्वी जेव्हा आपल्याकडे साक्षरतेचं प्रमाण अगदीच नगण्य होतं. त्यावेळी अनेक व्यवहार करतांना अंगठ्याचाच वापर केला जात असे. कागदोपत्री असलेल्या माहितीवर मान्यता म्हणून सही करता येणारे अगदीच थोडे लोक होते. बहुतांश लोक त्यावर आपल्या अंगठ्याचीच मुद्रा उमटवायचे. आणि खरी गंमत तर पुढेच आहे.ती तुझ्या लक्षातच आलेली नाही.’’
‘‘ती कोणती?’’
‘‘अरे आ्‌ॅफिसमध्ये येणारा माणूस कामचुकार असेल तर येतो उशिरा आणि सही करतांना वेळ मात्र टाकतो ऑफिस सुरू होण्यापूर्वीची. अशा लबाडीला आळा घालण्यासाठी आता कितीतरी ऑफिसेसमध्ये अंगठा लावण्याचं यंत्र लावलंय्‌. माहिती आहे नं? तो अंगठा यंत्रावर ठेवला की कर्मचारी कामावर हजर होण्याची, कार्यालयातून बाहेर पडण्याची नेमकी वेळ टिपली जाते. त्यामुळे लबाडीला चांगलाच आळा बसेल.’’
‘‘हो, म्हणजे खरंय तुझं म्हणणं. पटतंय्‌ मला.’’
‘‘मग आता गेला का रुसवा? चल मग ताठ मान करून दाखव मला.’’
अंजली अरुण पांडे
9923381641