विश्वचषक २०१९; सराव सामन्यात भारतीय संघ डगमगला

    दिनांक :26-May-2019
- रवींद्र जडेजाचे अर्धशतक
- न्यूझीलंड 6 गड्यांनी विजयी
लंडन, 
 
आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ डगमगला. अर्धशतकवीर रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांच्याशिवाय इतर कोणताही फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांना समर्थपणे तोंड देऊ शकला नाही. न्यूझीलंडने भारतावर 477 चेंडू शिल्लक ठेवत 6 गड्यांनी विजय नोंदविला. भारतीय संघ 39.2 षटकात 179 धावातच बाद झाला आणि न्यूझीलंडने 37.1 षटकात 4 गडी गमावत विजयाचे लक्ष्य गाठले. केन विल्यम्सन (67) व रॉस टेलरने (71) अर्धशतकी खेळी करत विजय साकार केला.
 
 
 
 

 
 
 
डावखुरा मध्यमगती वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि उजव्या हाताचा मध्यमगती वेगवान गोलंदाज जेम्स निशाम यांच्या गोलंदाजीपुढे भारताच्या दिग्गज फलंदाजांनी हात टेकले. फळ्यावर शंभर धावा लागण्यापूर्वीच भारताने आपले सात फलंदाज गमावले. सलामी फलंदाज रोहित शर्मा (2) व शिखर धवन (2) यांना बोल्टने स्वस्तातच बाद केले. कर्णधार विराट कोहलीने (18) धावा वाढविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा साथीदार चौथ्या क्रमांकावरील लोकेश राहुल (6) लवकरच बाद झाला. रोहित, शिखर व लोकेश या तिघांचेही बळी ट्रेंट बोल्ट टिपले. कोलहीने हार्दिक पांड्याच्या साथीने 39 धावांपर्यंत पोहोचवले, परंतु त्याचवेळी डी ग‘ॅण्डहोमने कोहलीचा (18) त्रिफळा उडविला. हार्दिक पांड्याने धोनीच्या साथीने धावा वाढविण्याचा प्रयत्न केला. संघाच्या 77 धावा झाल्या असताना निशामने पांड्याला ब्लेंडलकडून झेलबाद केले.
 
 
 
हार्दिक पांड्याने 37 चेंडूत 6 चौकारांसह 30 धावांची भर घातली. त्यानंतर धोनीला साथ द्यावयास असलेल्या दिनेश कार्तिकलासुद्धा निशामने सोढीकडून झेलबाद केले. कार्तिक चार धावा काढून बाद झाला. नंतर धोनीही टिम साऊदीच्या गोलंदाजीत निशामकडून झेलबाद झाला. धोनी केवळ 17 धावा काढू शकला. अशा रीतिने भारताने 22.3 षटकात 91 धावात 7 फलंदाज गमावले. त्यानंतर सामन्याचे सूत्र आपल्या हाती घेत रवींद्र जडेजाने उर्वरित संघमित्रांच्या साथीने संघाला सुस्थितीत आणले. जडेजाने 50 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 54 धावा ठोकल्या. फर्ग्युसनने जडेजाला गप्टिलकडून कुलदीप यादवने 19 धावांचे योगदान दिले. कुलदीपला बोल्टने बाद करताच भारताचा डाव 39.2 षटकात 179 धावात संपुष्टात आला.
रॉबिन-राऊंड पद्धतीने खेळविल्या जाणार्‍या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत 16 जूनला मैदानात उतरणार आहे.