आयुष्याच्या प्रत्येक क्षणात तू खळखळून हसावं. तुझ्या प्रत्येक वाटेवर प्राजक्ताचा केशरगंध सडा अंथरावा. प्रत्येक ऋतूत तुझ्या जीवनात वसंतऋतूचा बहर यावा. आयुष्याच्या शंभर पायर्या तुला चढायच्या आहेत. त्या प्रत्येक पायरीवर तुझ्या जीवनात यश, कीर्ती आणि आनंद तुला मिळावा. तू जिंकावंस जगाला, परंतु ते तुझ्या प्रेमळ मनाने. मोठ्यांचा सदैव तुझ्यावर आशीर्वाद असावा व आजी-आजोबांच्या प्रेमळ वृक्षाच्या छायेत तू वाढावेस. तुझी स्वप्ने अगदी गगनाला भिडणारी असावी आणि ईश्वरकृपेने तुझी प्रत्येक स्वप्ने पूर्ण व्हावीत.

तुझे बालपण अगदी कालपरवाच संपून तू तारुण्यात प्रवेश करतोय्; परंतु बालपणी भुरूभुरू उडणारे तुझे कुरळे केस, रुणुझुणु वाजणारे पायातील वाळे आजही तो नाद मला ऐकू येतो. ते तुझे दुडुदुडु चालणे. तू प्रथम बोबड्या बोलांनी मारलेली ‘आई’ अशी साद त्या क्षणी झालेला अत्यानंद व जणू सहस्र पुष्पांचा वर्षाव होतानाचा तो अनुभव आजही स्मरणात आहे. शाळेतील तुझा पहिला दिवस. तुला, मला घेऊनच शाळेतील वर्गात बसायचे होते, त्यासाठी तुझा हट्ट. खरं सांगायचं तर मलासुद्धा तुला सोडून जायची इच्छा होत नव्हती रे, परंतु तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या वेळी तुला सोडावंच लागलं.
प्रत्येक क्षणाला तुला ओझं वाटणारी माझी उपदेशपर शिकवण, तुला नित्य नूतन काहीतरी शिकवण देत असते. अगदी काल-परवापर्यंत प्रत्येक क्षणाक्षणाला लागणारी आई आज तुझ्याकडून दुर्लक्षित होत आहे असे नाही का वाटत तुला? शाळेतून परतल्यावर प्रत्येक गोष्ट एकवेपर्यंत तुला चैन पडायची नाही. परंतु, आज मात्र कॉलेजमधून परतल्यावर आईऐवजी तुला भ्रमणध्वनी लागतो. सोशल मीडियावर अनेक मित्रांना जवळ करताना तू घरच्यांना मात्र दूर करतोस, याची जाणीव होतेय् का तुला?
ती संध्याकाळ अजूनही माझ्या समरणात आहे. वीज नसल्यामुळे सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलेलं होतं आणि तो भ्रमणध्वनीसुद्धा बंद पडला होता. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात तेव्हा तू मनसोक्त मारलेल्या गप्पा आठवतात. कॉलेजमधील तसेच शिकवणीवर्गातील गमतीजमती मला आनंदून गेल्या. त्या क्षणापुरतं वाटून गेलं की, कदाचित असं रोजच झालं तर... परंतु, आपण या सर्व गोष्टींच्या किती अधीन झालो आहोत, याची जाणीव झाली. अनेकदा किती छोट्या गोष्टीसुद्धा मनाला हर्षोल्लासित करून जातात. प्रत्येक नवीन दिवस काहीतरी नवीन सकारात्मक भावना आपल्या मनाला देऊन जातो. तुझ्यासोबत मनाचा आणि शारीरिक थकवा कुठल्या कुठे निघून जातो, ते कळतसुद्धा नाही.
उपनयन म्हणजे संस्काराचे लेणे. तुला त्या संस्कारात घातलेल्या भिक्षेचं विस्मरण होऊ देऊ नकोस. मी घातलेली संस्कृतीची, आदराची, आशेची, दीर्घायुष्याची तसेच आशीर्वादाची भिक्षा सदैव स्मरणात ठेव आणि जीवनात यशस्वी हो.
या सोशल मीडियाच्या काळात तुला हे पत्र वाचून आश्चर्यच वाटेल. कारण हा काळच इ-मेल, व्हाटस्अॅप, फेसबुकचा आहे, परंतु तू हे पत्र वाचायचं. कारण फेसबुक, व्हाटस्अॅप, इ-मेलचे मॅसेज केव्हा डीलिट होतात हे कळतसुद्धा नाही, परंतु माझं हे पत्र तुला अक्षय प्रेरणा देत राहील.
तुझीच आई.
मृणाल मंगेश भगत/दुर्गे
8007352221