बोंग जोन हो यांच्या चित्रपटास सुवर्ण पुरस्कार

    दिनांक :27-May-2019
बहात्तराव्या कान चित्रपट महोत्सवात दक्षिण कोरियाचे दिग्दर्शक बोंग जोन हो यांच्या ‘पॅरासाइट’ या चित्रपटास ‘पाम डी ओर’ सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. आशियाला हा पुरस्कार लागोपाठ दुसऱ्या वर्षी मिळाला असून गेल्या वर्षी जपानचे हिराकाझू कोरे इडा यांच्या ‘शॉपलिफ्टर्स’ चित्रपटाने हा पुरस्कार पटकावला होता. याशिवाय चार महिला दिग्दर्शकांनाही पुरस्कार मिळाले आहेत.
 
 

 
 
 
बोंग जोन हो हे हा पुरस्कार मिळवणारे दुसरे आशि`याई दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात दक्षिण कोरियातील गरीब-श्रीमंत यांच्यातील दरीमुळे निर्माण झालेली परिस्थिती हा कथाविषय आहे. बोंग जोन हो यांना फ्रेंच चित्रपट सृष्टीतील प्रमुख व्यक्तिमत्त्व असलेल्या कॅथरिन डेन्यू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिन पिअर व ल्युक डॅरडीनी या बेल्जियन बंधूंना ल जेन अहमद (यंग अहमद) या चित्रपटासाठी मिळाला आहे. यात स्थानिक इमामाने मुलास मूलतत्त्ववादाची शिकवण दिल्याची कथा आहे.
महोत्सवातील उपविजेतेपदाचा पुरस्कार ‘अ‍ॅटलांटिक’ या चित्रपटासाठी प्रथमच दिग्दर्शन करणाऱ्या मॅटी डियॉप यांना हॉलिवूड अभिनेते सिलव्हेस्टर स्टॅलोन यांनी प्रदान केला. या चित्रपटात सेनेगलमधील जीवनसंघर्षांची कहाणी आहे. परीक्षकांचा खास पुरस्कार फ्रान्सच्या लेस मिझरेबल्स या पॅरिसजवळ २००५ मध्ये झालेल्या दंगलीवर आधारित चित्रपटास, तसेच ब्राझीलच्या बाकुरू या क्लेबेर मेंडोन्स व ज्युलियानो डॉर्नेलीस यांच्या चित्रपटास मिळाला.

पुरस्कार
पाम डी ओर-‘पॅरासाइट’, बोंग जून हो
ग्रांप्रि- ‘अटलांटिक्स’, मॅटी डियोप
परीक्षक पुरस्कार – लेस मिझरेबल्स व बॅकुराउ
उत्कृष्ट अभिनेत्री- एमिली बीचम, लिटल जो
उत्कृष्ट अभिनेता- अंतोनियो बँडेरस, ‘पेन अँड ग्लोरी’
उत्कृष्ट दिग्दर्शक- जिन पियर, ल्युक डॅरडेनी, ‘द यंग अहमद’
उत्कृष्ट पटकथा- पोर्ट्ट ऑफ अ लेडी ऑन फायर ( सेलीन शियामा)
विशेष लक्षवेध पुरस्कार- इट मस्ट बी हेवन (एलिया सुलेमान)
कॅमेरा डी ओर – अवर मदर्स (सिझर डियाझ)
लघुपट – दी डिस्टन्स बिटविन अस अँड द स्काय (व्हॅसीलिस केकॅटोस)
विशेष लक्षवेध – मॉन्स्ट्रओस डियॉस, (ऑगस्टिना सॅन)
क्वीयर पाम फीचर – पोर्टेट ऑफ अ लेडी ऑन फायर (सेलीन शियामा)
क्वीयर पाम (लघुपट)- दी डिस्टन्स बिटविन अस अँड द स्काय (व्हॅसीलिस केकॅटोस)