वर्षे पाच, कमाई आठ जागांची!

    दिनांक :27-May-2019
 
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने 2014 ते 2019 मध्ये कोणती लक्षणीय कामगिरी केली? त्याचे उत्तर आहे- पाच वर्षांत फक्त आठ जागांची वाढ! 15 राज्यांमध्ये शून्य! तीन केंद्रशासित प्रदेशांत भोपळा! अमेठीत राष्ट्रीय अध्यक्षाचा पराभव!... ही अशीच स्थिती कायम राहिली, तर बहुमतापर्यंत मजल मारण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार? गणित करा. तोपर्यंत पक्ष जिवंत राहील काय, याचाही विचार करण्याची वेळ आताच आली आहे. पक्षाने यावर विचार केला आणि मंथन बैठक बोलावली- इतका दारुण पराभव का झाला, 52 जागाच का मिळाल्या, यावर चर्चा करण्यासाठी. नेहमीप्रमाणे बैठकीत नाट्य घडले वा घडवून आणले गेले म्हणा. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी पत्करून राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला. हे पाहून, आपण गांधी घराण्याशी किती एकनिष्ठ आहोत, हे दाखविण्याची सुवर्णसंधी कोण सोडणार? काही हुजर्‍यांनी त्याला विरोध दर्शविला आणि तो प्रस्ताव मग एकमताने मागे घेण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्षांनी अशा अत्यंत अडचणीच्या वेळी राजीनामा न देता, पक्षात नव्याने जीव फुंकण्यासाठी पक्षाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन करावे, आपल्या पक्षाची वैचारिक लढाई आणखी जोमाने लढावी, असा प्रस्ताव पारित करण्यात आला. हे होणारच होते.
 
 
 
 
आता प्रश्न निर्माण होतो, कॉंग्रेसच्या वैचारिक लढाईचा. कोणत्या वैचारिक लढाईच्या गप्पा मारत आहे कॉंग्रेस वर्किंग कमिटी? ‘भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणार्‍यांना आणखी मजबूत करावे, शहरी नक्षल्यांना एनजीओ म्हणावे, लष्करप्रमुखांना गुंडा म्हणावे, सर्जिकल आणि एअर स्ट्राईकचे पुरावे मागावेत, पंतप्रधानांना पुन्हा चोर म्हणावे, त्यांच्या शिलेदारांनी मोदींना शिव्यांची लाखोली वाहणे सुरू ठेवावे... कोणती वैचारिक लढाई लढणार आहे कॉंग्रेस आणि कुणासोबत लढणार आहे? आणि कुणासाठी लढणार आहे? ही लढाई लढण्यासाठी सोबतीला कुणाला घेणार आहेत राहुल गांधी? लोकांचा विश्वास ते पाच वर्षांत संपादन करू शकले नाहीत. आता येत्या पाच वर्षांत ते बहुमतापर्यंत मजल जाईल, एवढा आत्मविश्वास कॉंग्रेस पक्षात आणि जनतेत निर्माण करणार आहेत? कॉंग्रेस वर्किंग कमिटीने पारित केलेल्या ठरावात राहुल यांनी अनु. जाती, जमाती, ओबीसी, युवा, शेतकरी, अल्पसंख्यक यांच्यासाठी काम करावे, असे म्हटले आहे. हिंदीबहुल तीन राज्यांत कर्जमाफीच्या नावावर शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा परिणाम काय झाला, हे निकालातून दिसूनच आले आहे. आता कोणती लाच देणार शेतकर्‍यांना? म्हणे, न्याय योजना आणू, दरमहा सहा हजार देऊ. का विश्वास ठेवला नाही तुमच्या या योजनेवर मतदारांनी? कॉंग्रेस फसवेगिरी करणारा पक्ष आहे, असा संदेश गरीब, तळागाळातील जनमानसात का गेला? आता काय पुन्हा रघुराम राजन यांना, देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणारी एखादी योजना सांगा म्हणून साकडे घालणार आहेत राहुल गांधी? वैचारिक लढाई लढणार म्हणजे नेमके काय करणार? देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या कॉंग्रेसवरून जनतेचा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे. असे नसते तर पाच वर्षांत केवळ आठच जागा वाढल्या नसत्या. या देशातील जनतेचा विश्वास कसा संपादन करणार? दहशतवादी, नक्षलवादी यांना राष्ट्रद्रोहाची कलमे लावणार नाही, असे राहुल गांधी पुन्हा सांगणार आहेत का? देशातील शंभरावर मंदिरांत जाऊन पूजाअर्चा करूनही, हिंदू मतदारांनी कॉंग्रेसला का झिडकारले, आता याचे उत्तर ए. के. ण्टनी यांना ते विचारणार आहेत का? एकीकडे मंदिरांच्या वार्‍या आणि दुसरीकडे हिंदू दहशतवादी आहेत, असा प्रचार राहुल गांधी करणार आहेत का? कोणती वैचारिक लढाई राहुल गांधी लढणार आहेत? या वर्किंग कमिटीने पुन्हा राहुल गांधी यांच्या हाती सुकाणू देऊन पक्षाची उरलीसुरली इज्जत धुळीस मिळविण्याचा जणू परवाना बहाल केलेला दिसतो. राहुल कार्ड जनतेने नाकारले आणि सोबत प्रियांका कार्डही जनतेने फेकून दिले. मग कॉंग्रेस पक्षात वंशावळ चालविणारा दुसरा कोण? कॉंग्रेसच्या लोकांची कमालच म्हटली पाहिजे. पाहिजे तर गांधी-नेहरू घराण्याचाच अध्यक्ष, पक्ष खड्‌ड्यात गेला तरी चालेल! ही अशी निष्ठा जगात शोधून कुठे सापडणार नाही! आता पक्षाला उभारी देण्यासाठी राहुल काय करणार आहेत? कोण आहे त्यांच्या पक्षात जो जनमानसावर प्रभाव पाडू शकेल? राहुलजवळ आता कोणते शिलेदार उरले आहेत? सारेच कसे अद्भुत, अविश्वसनीय आणि अकल्पनीय.
तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममतांचा थयथयाट थांबता थांबेना. भाजपाला 18 जागा मिळाल्यामुळे प्रसिद्धिमाध्यमे दीदींना ज्या पद्धतीने कोसत आहेत, ते पाहून त्या अधिकच चवताळल्या आहेत. तर त्यांनीही चिंतन बैठक बोलावली. विषय एकच होता- भाजपाला विधानसभा निवडणुकीत कसे रोखायचे? कोणती रणनीती आखायची? या निवडणुकीत आपण एवढा हिंसाचार माजवला, कित्येक भाजपा कार्यकर्त्यांचे जीव घेतले, मतदानाच्या वेळी एवढा धिंगाणा केला, तरी भाजपाच्या 18 जागा आल्याच कशा? या घटनेने त्यांची झोप उडून गेली आहे. बरं, त्यांचे बोलणेही कॉंग्रेससारखेच अद्भुत. तावातावात त्या बोलून गेल्या की, मी राजीनामाच देते. मग कॉंग्रेसच्या हुजर्‍यांप्रमाणेच तृणमूलच्या हुजर्‍यांनीही त्यांची समजून घातली. त्यांची विधाने पाहा- मोदींची लाट वगैरे होती, हे मला मुळीच मान्य नाही. मोदींनी धार्मिक ध्रुवीकरण केले, पैसे ओतले. मतांची अगदी लूट करून एवढ्या जागा मिळविल्या. निवडणूक आयोग हा खरा ‘मॅन ऑफ द मॅच’ असून या आयोगानेच मोदींना जिंकण्यासाठी मदत केली वगैरे मुक्ताफळे दीदींनी उधळली. पुढे त्या म्हणाल्या, मोदींनी केवळ आमच्याच राज्यात मतांची लूटमार केली नाही तर गुजरात, हरयाणा, दिल्ली येथेही लूटमार केली. असे नसते तर कॉंग्रेसला तेथे एकही जागा का मिळाली नाही? दीदी तर इथपर्यंत बोलून गेल्या की, पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जिंकण्यासाठी विदेशी शक्तींची मदत घेतली. आमच्या सार्‍या प्रशासनावर कब्जा केला. आता बोला! यावरून दीदी किती कातावून गेल्या असतील, याची कल्पना यावी. आमच्या काही कार्यकर्त्यांना भाजपाने पैसे दिले आणि आमच्या विरोधात काम करायला लावले. आता मी या सर्वांची झाडाझडती घेणार आहे. पक्षाला आणखी मजबूत करणार आहे वगैरे त्या बोलल्या. ममतांच्या या बोलण्याला कवडीचा अर्थ नाही. ज्या दीदींची संपूर्ण राज्यात दहशत होती, ते पाहता दीदींचे सारे आरोप म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे!’ वस्तुस्थिती ही आहे की, मतदारांनी मौन बाळगले. पण, इव्हीएमध्ये भाजपाचे बटण दाबले. ‘चुपचाप कमल छाप...’ हा नारा मोदींनी दिला आणि मतदारांनी तो मनावर कोरून ठेवला. 18 वगळता सर्व उर्वरित जागांवर भाजपाचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर आहेत आणि हीच बाब विधानसभा निवडणूक लक्षात घेता ममतांना अस्वस्थ करीत आहे. आरामबागमध्ये तर भाजपाचा उमेदवार अवघ्या एक हजार तीनशे मतांनी पराभूत झाला. आजच्या घडीला प. बंगालमध्ये शंभरावर जागी भाजपाचे उमेदवार विधानसभा मतदारसंघात मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत. म्हणूनच तर मोदी म्हणाले, दीदींचे 40 आमदार आजही माझ्या संपर्कात आहेत. ते खरे आहे. तर अशी ही कॉंग्रेसची तर्‍हा आणि दुसरीकडे दीदींची तर्‍हा. पाहू या विधानसभेत काय होते ते...