रोख रक्कम काढताय?

    दिनांक :27-May-2019
अचानक उद्भवणार्‍या आर्थिक अडचणीच्या काळात क्रेडिट कार्ड खूप उपयुक्त ठरतं. कोणाला कोणतंही स्पष्टीकरण न देता तुम्ही झटपट पैसे मिळवू शकता. क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे काढता येतात. मात्र यामुळे तुमच्यावर बराच आर्थिक ताण येऊ शकतो. यावर बरंच जास्त व्याज भरावं लागतं. तसंच मोठ्या प्रमाणावर कॅश ॲडव्हान्स शुल्कही भारावं लागतं. क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे काढणं सोपं वाटत असलं तरी त्याचे काही दुष्परिणामही आहेत. व्याज भरण्यासोबतच तुम्हाला विविध प्रकारची शुल्कंही भरावी लागतात. 
 
 
क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे काढले जातात तेव्हा बँका भरपूर व्याज आकरतात. क्रेडिट कार्ड खरेदी करताना व्याजाची ठरलेली रक्कम आकारली जाते. व्यवहार झाल्याच्या तारखेपासून पूर्ण रक्कम परत करेपर्यंतच्या कालावधीपर्यंतचं व्याज आकारलं जातं. सर्वसाधारणपणे 2.5 टक्के ते 3.5 टक्के मासिक व्याज आकारलं जातं. बँकेनुसार या व्याजदरांमध्ये बदल होत जातात. तसंच कार्डच्या प्रकारानुसारही व्याजदर बदलतात. क्रेडिट कार्डद्वारे रोख रक्कम काढली तर तुम्हाला व्याजमुक्त कालावधीचे लाभ मिळत नाहीत. सर्वसाधारणपणे कार्डधारकाला 45 दिवसांचा व्याजमुक्त कालावधी मिळतो. मात्र रोख रक्कम काढल्यास तुम्हाला पूर्ण रक्कम परत करेपर्यंत व्याज भरावं लागतं.
 
रोख रक्कम काढण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरल्यावर कॅश ॲडव्हान्स शुल्क आकारलं जातं. रोख रक्कम काढल्यानंतर प्रत्येक वेळी हे शुल्क आकारतात. काढलेल्या रकमेच्या अडीच ते तीन टक्क्यांपर्यंत हे शुल्क आकारलं जातं किंवा किमान 300 ते 500 रुपये आकारले जातात. हे शुल्कही कार्डच्या प्रकारानुसार बदलतं. इतर काही आर्थिक शुल्कंही आकारली जातात. तसंच या व्यवहारांसाठी कार्डधारकाला कोणतेही रिवॉर्ड पॉईंट्‌स मिळत नाहीत. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरून रोख रक्कम काढण्याआधी या बाबींचा विचार करावा.