डॉ. पायल आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टर निलंबित

    दिनांक :27-May-2019
मुंबई : डॉक्टर पायलच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज विविध संघटनांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने केली तर महिला आयोगाने रुग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस बजावून अहवाल मागितला आहे.
या पार्श्वभूमीवर डॉक्टर पायल तडवीचं रॅगिंग करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या नायर रुग्णालयातील तीन कनिष्ठ डॉक्टरांवर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात 'मार्ड'ने या तिघींचेही सदस्यत्व निलंबित केले आहे.  
संबंधित विभागाच्या प्रमुखांनाही निलंबित करण्यात यावे , अशी मागणी 'मार्ड'ने केली आहे. पायल तडवीने वरिष्ठ सहकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल तोंडी व लेखी तक्रार करूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही आणि एका उमद्या डॉक्टरचा जीव गेल्याचे 'मार्ड'चे म्हणणे आहे. पायलने २२ मे रोजी आत्महत्या केली होती.
पायलच्या आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात २३ मे रोजी डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे, रॅगिंग व अट्रॉसिटी कायद्याखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉक्टरांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवर या तिन्ही डॉक्टर पायलला तिच्या जातीवरून हिणवायचे, असा आरोप पायलच्या कुटुंबीयांनी केला आहे.