उष्माघात पशु-पक्ष्यांसाठीही जीवघेणा!

    दिनांक :27-May-2019
कडक उन्हाळा सर्वांनाच असह्य
 
नागपूर: तीव्र उन्हाचे चटके बसू लागताच प्रत्येक जण पाणी अथवा गारवा शोधतो. माणसाला ही गरज पूर्ण करणे सहज साध्य होते. प्राणी व पक्ष्यांना मात्र नैसर्गिक स्रोतांमधूनच आपली गरज भागवावी लागत असल्याने उन्हाळा नकळत अनेक पशु-पक्ष्यांच्या जिवावर बेततो.
 

 
 
उन्हाळा आला की, उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन सारेच करतात आणि तशी काळजीही प्रत्येक जण घेत असतोच. पण, पारा ४५ अंशांवर असताना उन्हाच्या झळा पशु-पक्ष्यांना बसत नसेल काय? प्राण्यांनाही ऊन लागू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात त्यांची काळजी घेणे आवश्यक ठरते. दुपारी पशु-पक्षी फारसे बाहेर पडत नाही. सकाळी ऊन चढण्यापूर्वी आणि सायंकाळी ऊन उतरल्यावर हे जीव पोटापाण्यासाठी बाहेर निघतात. कारण, या प्राण्यांनाही ऊन सहन होत नाही. एक तर या प्राण्यांच्या शरीरावर घामाच्या ग्रंथी नसतात. त्यामुळे त्यांना घाम येत नाही. घाम आल्याने शरीराचे तापमान नैसर्गिक रीत्या कमी होते. पण, या प्राण्यांना घामच येत नसल्याने शरीराचे तापमान त्या पद्धतीने कमी होत नाही. क जीवनसत्त्वाची कमतरताा निर्माण होते. त्यामुळे तोंडावाटे जोरात श्वास घेऊन ते तापमान कमी करण्याचा प्रयत्न करतात.
पाळीव प्राण्यांची काळजी घेतली जाते. भटक्या प्राण्यांचे मात्र प्रचंड हाल होतात. त्यांच्यासाठी घराबाहेर पाणी ठेवणारे अनेक संवेदनशील आहेत. प्राण्यांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले की, त्यांनाही ऊन लागते. बरेचदा डिहायड्रेशनचा त्रास या प्राण्यांनाही होतो. अतिउन्हात फिरणे, पाणी न मिळणे, आजारी तसेच उपाशी असणे, यामुळे ऊन लागण्याचा धोका जास्त असतो. श्वान किंवा मांजर अचानक जोराजोरात धापा टाकत असेल, लाळ गाळत असेल, नाकातून रक्त येत असेल, शरीराचे तापमान १०६ च्या वर असेल, ओकाऱ्या होत असतील तर नक्कीच त्यांना ऊन लागल्याचे समजावे. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकांकडून उपचार करून घेणे आवश्यक ठरते. अन्यथा संबंधित प्राण्याचा मृत्यू संभवतो. शहरातील हिरवळ व जलस्रोत कमी होत चालले असून त्याचा पक्ष्यांच्या अधिवासावर प्रचंड परिणाम झाला आहे. तसेच नागरिक आपल्या घरात अथवा इमारतीतील पक्ष्यांची घरटी काढून टाकतात. अशा परिस्थितीत हे पक्षी बाहेर येतात व निवाऱ्याचा  पर्याय न मिळाल्याने उन्हाला बळी पडतात. या पक्ष्यांना ग्लुकोज व प्रतिजैविके देऊन उडण्यास सक्षम झाल्यानंतर रात्री नैसर्गिक अधिवासात सोडणे गरजेचे असते. पगी, बॉक्सर, बुलडॉग, पेकिनीज आदी श्वानांच्या प्रजातींना उन्हाचा धोका अधिक असतो. कारण, त्यांचे नाक चपटे असते. त्यामुळे ते वेगाने शरीरातील उष्णता नाक वा तोंडावाटे बाहेर टाकू शकत नाही.
 
पक्ष्यांसाठी काय कराल?
मानवाप्रमाणे पशु-पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. एक जागरूक नागरिक म्हणून आपण पक्ष्यांसाठी घरटी उभारावी अथवा इमारतीवर पाण्याची भांडी ठेवावी. ही भांडी सावलीत ठेवावी तसेच त्यातील पाणी काही काळाने बदलावे. उन्हाळ्यात इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नका व शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवा.