पुणे मनपाला प्रतिदिन 37 लाखांचा दंड

    दिनांक :27-May-2019
पुणे: नदीमध्ये सोडल्या जाणार्‍या प्रक्रियाविरहित सांडपाण्यामुळे सर्वाधिक प्रदूषण होऊनही त्यावर उपाययोजना करण्यात हयगय केल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून पुणे महानगरपालिकेवर कडक कारवाई करण्यात आली आहे. यात दररोज तब्बल 37 लाख रुपये दंड आकारण्यात येत आहे.
नदीमध्ये सोडल्या जाणार्‍या प्रक्रियाविरहित सांडपाण्यामुळे नदीत सर्वाधिक प्रदूषण होत आहे. यावर महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले होते. मात्र, महानगरपालिकेने या संदर्भात आदेशाची पूर्तता न केल्याने महामंडळाकडून थेट दंड लावण्यात आला. या कारवाईत आतापर्यंत महानगरपालिकेचे 15 कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. शिवाय प्रतिदिन 37 लाख रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळेच प्रशासनाचे डोळे उघडले असून नदीसुधार प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रशासनाने पावले टाकण्याला सुरुवात केली आहे.
त्यानुसार खुद्द महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दौर्‍याचे आयोजन केले आहे. नदीसुधार प्रकल्पांतर्गत कोणती कामे करायची आहेत, याचा अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे सांगून प्रशासनाकडून या विषयावर मलमपट्टी करण्यात येत आहे. राव हे अधिकार्‍यांसमवेत नदीकाठाची (रिव्हरवॉक) पाहणी करणार असल्याचे समजते.