मोदींची वापसी, निर्देशांक नव्या उंचीवर

    दिनांक :27-May-2019
मुंबई: केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या वापसीचा जल्लोष शेअर बाजारात अजूनही सुरूच आहे. गुंतवणूकदारांनी आज सोमवारीही खरेदीवरच भर दिल्याने, मुंबई शेअर बाजार 249 अंकांच्या कमाईसह 39,683.29 अशा नव्या शिखरावर पोहोचला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारानेही नवी उंची गाठली.
आज सकाळची सुरुवात 100 अंकांच्या कमाईने झाल्यानंतर शेअर बाजारात खरेदीला जोर आला होता. दुपारपर्यंतच्या व्यवहारात कमाई 400 अंकांच्या घरात गेली होती, पण त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यावरही भर दिल्याने, बाजारात काही प्रमाणात घसरणही पाहायला मिळाली. दिवसभराच्या उलाढालीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक 248.57 अंकांच्या कमाईसह 39,683.29 या स्तरावर बंद झाला. हा आजवरचा उच्चांक मानला जात आहे. यस बँक, एनटीपीसी, एल अॅण्ड टी, अॅक्सिस बँक, स्टेट बँक, मिंहद्र अॅण्ड मिंहद्र, एचडीएफसी, वेदांता, पॉवर ग्रीड, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एचसीएल, टीसीएस आणि आयटीसी यासारख्या कंपन्यांचा आजच्या व्यवहारात चांगला फायदा झाला, तर इंडसइंड बँक, रिलायन्स उद्योग, एशियन पेंट्‌स, भारती एअरटेल, ओएनजीसी, मारुती, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, कोल इंडिया हिरो मोटर्स आणि इन्फोसिस या कंपन्यांना नुकसान सहन करावे लागले.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 80.65 अंकांची कमाई केली. या बाजारातही चढ-उतार पाहायला मिळाला. दिवसभराच्या उलाढालीनंतर निफ्टी 11,924.75 या स्तरावर बंद झाला.