सेनापतींचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी

    दिनांक :27-May-2019
 बरिसोपाच्या संस्थापकांना केवळ ३४१२ मते
 बैठकीत पक्ष धोरणावर कार्यकर्त्यांची नाराजी
 
नागपूर: नागपूर लोकसभा मतदारसंघातून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांना केवळ ३४१२ मते मिळाल्याने त्यांचा लाजिरवाना पराभव झाला. या पराभवाचे तीव्र पडसाद २५ मे रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत उमटले. अनेक पदाधिकाèयांनी पक्षाच्या ध्येय, धोरणांवर टीकास्त्र सोडल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
 
 
२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर डॉ. सुरेश माने यांना बसपातून काढण्यापूर्वीच त्यांनी पक्षत्याग केला. त्यानंतर त्यांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची स्थापना केली. अनेक जुने पदाधिकारी बसपातून बरिसोपात गेले. त्यामुळे बसपा कमजोर होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. विधानसभा निवडणुकीत उत्तर नागपुरातून बसपाच्या तिकिटावर दुसèया क्रमांकाची मते घेणारे किशोर गजभिये त्यांच्यासोबत गेले. याशिवाय अनेकांनी बसपा सोडून बरिसोपात प्रवेश केला. परंतु, पक्षबांधणी न करता त्यानंतर झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत बरिसोपाने उमेदवार उभे केले. या निवडणुकीत बरिसोपाच्या उमेदवारांची दमदार कामगिरी राहिली नाही. उलट बसपाचे दहा नगरसेवक निवडून आले. तरीही पक्षप्रमुखांनी नागपुरातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाच्या अनेक उमेदवारांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली.
डॉ. सुरेश माने हे संविधान आणि कायद्याचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. डॉ. माने हे मुंबईला राहतात. त्यांचे नागपुरात मतदान नाही. ते स्वत:चे मतदान स्वत:ला देऊ शकत नाहीत. तरीही त्यांनी नागपूर लोकसभा निवडणूक लढविली. त्यात त्यांना चांगलाच फटका बसला. केवळ ३४१२ मते मिळाली. एका पक्षाच्या प्रमुखाला इतकी कमी मते मिळाली, याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. हा पराभव पक्षासाठी लाजिरवाणा असल्याचे बरिसोपाच्या कार्यकत्र्यांचे म्हणणे आहे.