ऋषभ पंतची कमतरता नक्कीच जाणवेल : अझरुद्दीन

    दिनांक :27-May-2019
नवी दिल्ली,
 
ऋषभ पंत हा आक्रमक फलंदाज आहे. परिस्थितीची आणि स्वत:च्या खेळाची पर्वा न करता पंत धावा काढण्यावर भर देतो. त्यामुळे या विश्वचषकात त्याची कमतरता नक्कीच जाणवेल, असं मत भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी व्यक्त केले.
विश्वचषकासाठीच्या संघात ऋषभ पंतला स्थान देण्यात आले नाही. निवड समितीच्या या निर्णयावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी टीकाही केली होती. त्यापार्श्वभूमीवर अझरुद्दीन यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. विजय शंकर चौथ्या क्रमांकावर खेळेल असे वाटते. तसेच हार्दीक पंड्याचा एक्स फॅक्टरही कामाला येईल. संघाकडे जसप्रीत बुमराहसारखे चांगले गोलंदाज आहेत, असं अझहरुद्दीननं सांगितलं.
 
 

 
 
 
कुलदीप, चहल आणि जडेजा स्पिन अटॅक करण्यात तरबेज आहेत. त्यांनी संयम बाळगल्यास कोणत्याही संघासाठी ते धोकादायक ठरू शकतात, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानी संघाबद्दलही आपलं मत व्यक्त केलं. रियाज आणि मोहम्मद आमीर यांचं पाक संघात पुनरागमन झालं असलं तरी या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमच फेव्हरिट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
न्यूझीलंडचा संघ नेहमीच प्रबळ होता. पण दुर्देवानं न्यूझीलंड कधीच वर्ल्ड कप जिंकू शकला नाही. केन विलियम्सन, रोस टेलर आणि त्यांचे सहकारी चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे, असं सांगतानाच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडशिवाय भारतीय संघ वर्ल्डकपचे खरे दावेदार असल्याचंही त्यांनी सांगितलं.