भारताविरुद्धच्या विजयाने आत्मविश्वास वाढला : ट्रेंट बोल्ट

    दिनांक :27-May-2019
भारताविरुद्धच्या सराव सामन्यात स्विंग चेंडूंचा प्रभावी वापर करीत न्यूझीलंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावलेला जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने भारताविरुद्धच्या विजयाने आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले.
 
 
 

 
 
 
ओव्हल मैदानावर झालेल्या सामन्यात बोल्टने ३३ धावा देत ४ बळी मिळवल्यामुळेच भारताचा डाव १७९ धावांमध्ये संपुष्टात आला. ‘‘चेंडू स्विंग होत असल्याचे बघितल्यावर मला चांगलाच आनंद झाला. इंग्लंडच्या सर्वच खेळपट्टय़ा अत्यंत सुंदर असल्याने या वातावरणात खेळण्याचा वेगळाच आनंद मिळणार आहे. गोलंदाज म्हणून अधिकाधिक चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, जेव्हा चेंडू स्विंग होत नसेल, त्यावेळी अचूक गोलंदाजी करणे हे मोठे आव्हान राहणार आहे,’’ असे बोल्टने सांगितले.
‘‘कोणत्याही संघाने प्रारंभीचे फलंदाज झटपट गमावले तर त्याचा परिणाम काय होतो, हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे सलामीलाच दोन-तीन बळी झटपट घेऊन प्रतिस्पर्धी संघावर दडपण टाकण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. हेच आमचे प्रारंभीचे लक्ष्य असून त्यानंतर पुढील नियोजनानुसार अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यावर भर देणार आहोत,’’ असे बोल्टने सांगितले.