चीनचे उपाध्यक्ष तीन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर

    दिनांक :27-May-2019
इस्लामाबाद,
 
चीनचे उपाध्यक्ष वँग क्विशान हे तीन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर असून रविवारी त्यांचे इस्लामाबाद येथे आगमन झाले. या दौऱ्यामध्ये क्विशान हे पाकचे राष्ट्रपती आरिफ अल्वी, तसेच पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतील. सुमारे ६० अब्ज डॉलरचा चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर विकसित करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित मुद्द्यांवर क्विशान यांच्या दौऱ्यामध्ये चर्चा होणार असल्याचे समजते.
 
 

 
 
रविवारी, पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी अन्य उच्चाधिकाऱ्यांसमवेत क्विशान यांचे विमानतळावर स्वागत केले. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान काही महत्त्वाचे करार अपेक्षित आहेत, त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभही करण्यात येईल. पाकिस्तानच्या दौऱ्यानंतर क्विशान जर्मनी आणि नेदरलँड्सच्या दौऱ्यावरही जाणार आहेत.