बारावी निकाल : अमरावती विभाग विदर्भात अव्वल

    दिनांक :28-May-2019
राज्यात तृतीय स्थानावर
यंदाही मुली आघाडीवर
 
अमरावती: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (इयत्ता बारावी) निकाल मंगळवार 28 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. या निकालात अमरावती विभाग 87.55 टक्के निकालासह राज्यात तृतीय तर विदर्भात पहिल्या स्थानावर राहीला आहे. विभागात यंदाही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.53 टक्क्यांनी यंदाचा निकाल घसरला आहे.

 
 
अमरावती विभागीय मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनिल पारधी, सहसचिव डॉ. जयरी राऊत यांनी निकालाचा तपशील प्रसार माध्यमांसमोर ठेवला. अमरावती विभागातल्या जवळपास 1 हजार 538 कनिष्ठ महाविद्यालयातून 1 लाख 41 हजार 691 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1 लाख 24 हजार 49 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 65 हजार 550 मुलांची तर 58 हजार 499 मुलींची संख्या आहे. अनुक्रमे 84.47 व 91.27 अशी त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 91.55 टक्के निकाल वाशीम जिल्ह्याचा लागला असून 89.75 टक्क्यांसह बुलढाणा दुसर्‍या, 87.42 टक्क्यांसह अकोला तिसर्‍या, यवतमाळ 86.73 टक्क्यांसह चौथ्या तर अमरावती 84.49 टक्क्यांसह पाचव्या क्रमांकावर राहीला आहे. गेल्यावर्षी पेक्षा अमरावती विभागाच्या निकालात 0.53 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वेळेस विभागाचा निकाल 88.08 टक्के लागला होता. 9 हजार 843 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणी उत्तीर्ण झाले आहे. प्रथम श्रेणीत 52 हजार 956, द्वितीय श्रेणीत 58 हजार 30 तर 3 हजार 220 विद्यार्थी फक्त उत्तीर्ण झाले आहे. विज्ञान शाखेचे 94.89, कला शाखेचे 81.89, वाणिज्य शाखेचे 93.13, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचे (एमसीव्हिसी) 75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनिल पारधी, सहसचिव डॉ. जयश्री राऊत यांनी सांगितले.
 
जिल्हा      2017          2018    2019

वाशीम     91.31         90.40   91.55
बुलढाणा   90.81        89.71    89.75
अकोला    89.81        88.32    87.42
यवतमाळ 88.40        85.65    86.73
अमरावती 89.85        87.48    84.49