जपानमधील आरोग्य देणारे मंदिर

    दिनांक :28-May-2019
देवाचिया द्वारी
अवंतिका तामस्कर
 
नमस्कार मंडळी!
देवाचिया द्वारीच्या पहिल्या भागात आपले सहर्ष स्वागत आहे. या सदरात माझा हा प्रामाणिक प्रयत्न असेल की जगातली जगावेगळ्या मंदिराची माहिती तुम्हाला द्यावी. अखेर धर्म कुठलाही असो सबका मलिक एकच आहे. मग तो मालिक मंदिराच्या गाभार्‍यात असो वा स्तूपामधील गाभार्‍यात असो. जिथे गेल्यावर आत्मशांती मिळते अशा सगळ्या जगातील आगळ्यावेगळ्या श्रद्धेय स्थानांची सफर परिपूर्ण माहितीसह मी या सदरात देण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपण जपानच्या एका मंदिराची आगळीवेगळी माहिती जाणून घेणार आहोत. 
 
 
जपानच्या कागावा प्रांतातील कोनीपारा हे धर्मस्थळ, सुदृढ आरोग्य देणारे म्हणून प्रसिद्ध असून येथे दरवर्षी शेकडो लोक धावत धावत जाऊन देवाचे दर्शन घेतात. त्यासाठी दरवर्षी येथे अशाप्रकारची स्पर्धा भरविली जाते व त्यात तीन वर्षांच्या बालकापासून ते 80 वर्षांच्या वृद्धांपर्यंत स्पर्धक सहभागी होतात. अनेक लोक या स्पर्धांची वर्षातून आतुरतेने वाट पाहतात.
 
या धर्मस्थळांचे वैशिष्ट म्हणजे येथे जाण्यासाठी तब्बल ७८५ पायर्‍या चढाव्या लागतात. येथे दरवर्षी या पायर्‍या पळत चढणे व पुन्हा उतरणे अशी स्पर्धा घेतली जाते. यंदाच्या स्पर्धेत ५०० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत भाग घेणे ही एकप्रकारची प्रार्थना असल्याची जपानी लोकांची भावना आहे. या पायर्‍या चढून देवाचे दर्शन घेतले की चांगली प्रकृती लाभते, असाही भाविकांचा विश्वास आहे. यंदाची स्पर्धा ४७ वर्षीय ताकामात्सु नावाच्या इसमाने जिंकली.
 
त्याने केवळ १२ मिनिटांत हे अंतर कापले. आश्चर्य म्हणजे ही यात्रा सुरू होताना लोकांची संपूर्ण तपासणी केली जाते. म्हणजे रक्तदाब, हृदयरोग यांची वैदकीय तपासणी केली जाते आणि यात्रा संपल्यावर लोकांना अतिशय आश्चर्यकारत बदल जाणवतो. अनेकांचा मधुमेह कमी झाल्याचा, रक्तदाब साधारण झाल्याचे जाणवले आहे. हे धर्मस्थळ अतिशय प्राचीन असून ते पहिल्या शतकातले असल्याचे सांगितले जाते.