कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

    दिनांक :28-May-2019
नागपूर: बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने वाडी येथील मंगलधाम सोसायटी येथे राहणाऱ्या  खुशी उर्फ रिया मनोज सिंग या १७ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. खुशी उर्फ रियाचे वडील ट्रान्सपोर्टर असून त्यांचे वाडी येथे ट्रान्सपोर्ट कार्यालय आहे. खुशीला आईवडिल आणि लहान भाऊ आहे. खुशीने सेंट पॉल हायस्कूलमधून बारावी विज्ञानची परीक्षा दिली होती. वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा तिचा विचार होता. त्यासाठी तिने आकाश इन्स्टिट्युट येथे शिकवणी लावली होती. मंगळवारी दुपारी एक वाजता तिचा निकाल जाहीर होणार होता. त्यामुळे सकाळी ती आपल्या मैत्रिणींसह डिफेन्स येथील साई मंदिरात दर्शनासाठी गेली होती. घरी परत येत असताना तिने ऑनलाईन निकाला पाहिला असता अपक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती निराश झाली होती. काही वेळ मैत्रिणीसोबत घालवून दुपारी १,४५ च्या सुमारास ती घरी आली.
 
 
 
त्यावेळी भावाची प्रकृती बरी नसल्याने तिचा भाऊ आराम करीत होता. आई हॉलमध्ये होती. घरी आल्यानंतर ‘माझे डोके दुखत आहे असे आईला सांगून ती आपल्या खोलीत गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नव्हती. तिच्या आईने तिला आवाज दिला असता तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. खिडकीतून आत पाहिले असता ती पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आली. आईने आरडाओरड केल्याने शेजारी धाऊन आले. शेजाऱ्यांनी दार तोडून तिला खाली उतरविले. तिला खाजगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.