दुष्काळी भागात सरकार पाडणार कृत्रिम पाऊस

    दिनांक :28-May-2019
मुंबई: यंदा महाराष्ट्राला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे दुष्काळ निवारणासाठी सरकाय काय उपाय योजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर्षी महाराष्ट्र सरकारने दुष्काळावर उपाय म्हणून लवकरच कृत्रिम पावसाचे प्रयोग करणार असल्याचे सांगितले. यासाठी राज्य सरकारने 30 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कृत्रिम पावसाचे हे प्रयोग जास्तीत जास्त मराठवाड्यात करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले.

दुष्काळग्रस्त भागातील धरण परिसरात हा प्रयोग केला जाणार असून मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळाली. यावर्षी महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. तसेच राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मान्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल हळू राहणार आहे. यामुळे केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे.