‘काफिर’चा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक :28-May-2019
विविध विषयांवरील वेबसीरिज हा तरुणाईचा कायमच लाडका विषय आहे. सिनेविश्वातील अनेक कलाकार सध्या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहेत. झी५ वरील ‘काफिर’ या सीरिजची अनेकजण आतुरतेने वाट बघत आहेत. या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरला चांगला प्रतिसाद आहे.’काफिर’मधून अभिनेत्री दिया मिर्झा वेबसीरिज विश्वात पदार्पण करत आहे. या सीरिजमध्ये मोहित रैना सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. एका दहशतवादी आरोपीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकार-वकिलाचा प्रवास या सीरिजमध्ये दिसतोय.
 
 
 
ट्रेलरमध्ये असे दिसून येते की, दियावर दहशतवादाचे आरोप करण्यात आले आहेत व ती अनेक वर्ष तुरुंगात आहे. दियाची एक लहान मुलगीसुद्धा या ट्रेलरमध्ये दिसतेय. मोहित रैनाने एक पत्रकाराची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याने वकीलीचेही शिक्षण घेतले आहे. दिया मिर्झाला न्याय मिळवून देण्यासाठी तो पुन्हा वकीली पेशा स्वीकारतो असे दिसते. ट्रेलरमधील पार्श्वसंगीत अंगावर काटा आणणारं आहे.
या सीरिजचे दिग्दर्शन सोनम नायर यांनी केले असून लेखन भवानी अय्यर यांनी केले आहे. ही कथा सत्य घटनांवर आधारित आहे. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राशी बोलताना दियाने सांगितले की, मी इतकेच सांगू शकते की ही कथा सत्य घटनांवर आधारित आहे. ही कथा लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आतापर्यंत मी ऐकलेल्या कथांपैकी ही सगळ्यात सुंदर कथा आहे. ही भूमिका मला साकारत आली हे माझं भाग्य आहे. ही सीरिज झी५ वर १५ जूनला प्रक्षेपित होणार आहे.